मुंबई : भाजप-शिवसेनेची युती झाली असली तरी मुख्यमंत्री पदावर दोन्ही पक्ष आपला दावा सांगत आहेत. एकीकडे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी युतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील अशी घोषणा केली. तर शिवसेनाही मधून-मधून मुख्यमंत्री पदावर दावा सांगत आहे. मात्र जागावाटप पाहिलं तर युतीत शिवसेनेला केवळ 124 जागा मिळाल्या आहेत. मग तरीही शिवसेना मुख्यमंत्री पदावर दावा कोणत्या आधारावर करत आहे.


शिवसेनेने दसरा मेळाव्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर दावा केला. उद्धव ठाकरे यांच्या आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाषण केलं. आपल्या भाषणात संजय राऊत यांनी म्हटलं की, पुढच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शेजारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बसलेले असतील. संजय राऊतांचा इशारा आदित्य ठाकरे यांच्याकडे होता, हे सर्वांना कळालं. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.



आता शिवसेनेचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न खरंच पूर्ण होणार का? याकडे नजर टाकूया. महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत. युतीच्या जागावाटपात शिवसेनेला 124 जागा मिळाल्या आहेत. तर 164 जागा भाजप आणि मित्रपक्षांकडे आहेत. मित्रपक्ष भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने तांत्रिकदृष्ट्या ते निवडून आल्यास भाजपचेच आमदार असतील. भाजपने या निवडणुकीत 145 चा बहुमताचा आकडा पार केला तर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील.


मात्र भाजप बहुमतापासून दूर राहिली तर शिवसेना मुख्यमंत्री पदावर दावा करु शकते. मुख्यमंत्रीपदासाठी गरज पडल्यास शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीचीही मदत घेऊ शकते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला मदत करावी लागली तर नक्की करु, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात मांडली होती.



शिवसेनेला माहित आहे की, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणे सोपं नाही. मात्र राजकीय रणनितीनुसार वारंवार शिवसेना मुख्यमंत्री पदावर दावा करत आहेत. युतीची सत्ता आल्यानंतर भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी शिवसेनेचं राजकीय वजन कमी होऊ नये, यासाठी शिवसेना भाजपवर दबाव निर्माण करत आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.


आता राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असणार की भाजपचा, हे 24 ऑक्टोबरला स्पष्ट होईलच. तोपर्यंत युतीतील नेत्यांच्या अशी वक्तव्य पुन्हा पुन्हा ऐकू येतील यात शंका नाही.


VIDEO | महाराष्ट्रात पुन्हा फडणवीसच मुख्यमंत्री- अमित शाह