अहमदनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची ओळख हॅट्रिक मतदारसंघ म्हणून आहे. गेल्या 25 वर्षांपासून हा मतदारसंघ भारतीय जनाता पक्षाच्या ताब्यात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.


1980, 1985 आणि 1990 या तीन टर्ममध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र 1995, 1999 आणि 2004 या तीनही निवडणुकीत भाजपकडून सदाशिव लोखंडे यांनी विजय मिळवत हॅट्ट्रिक मारली. त्यांनतर 2009 साली प्रा. राम शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि 2009 साली राम शिंदे हे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. त्यांनतर 2014 साली राम शिंदे यांच्या विरोधात टक्कर देणारा उमेदवार नसल्याने राम शिंदे यांचे वर्चस्व कायम राहिले आणि सलग दुसऱ्यांदा राम शिंदे यांचा विजय झाला.


कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या 25 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत राम शिंदे यांच्या विरोधात प्रबळ दावेदर नसल्याने राम शिंदे यांचा विजय झाला. राज्यात सत्ता येताच राम शिंदे यांना राज्यमंत्री आणि 2 वर्षांनी पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मंत्रिपद मिळाल्यानंतर राम शिंदे यांनी 60 वर्षांचा अनुशेष काढून कर्जत आणि जामखेड दोन्ही तालुक्यात निधी आणून स्थानिक स्वराज संस्था, बाजार समिती, नगरपरिषद ते ग्रामपंचायत सर्व सत्ताकेंद्र काबीज करून मतदारसंघात एकतर्फी वर्चस्व निर्माण केले.


आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची तिसरी पिढी म्हणजे नातू रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. रोहित पवार यांनी गेल्या 1 वर्षांपासून या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. बेरोजगारांसाठी कार्यशाळा, दुष्काळग्रस्त भागात टँकर देऊन जनतेपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे रोहित पवार यांची उमेदवारी ही राम शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते.


एकीकडे रोहित पवार यांनी या मतदारसंघात उडी घेतली असली तरी रोहित पवारांना पक्षातूनच आव्हान उभे राहिले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेल्या मंजुषा गुंड यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहोत, त्यामुळे कर्जत-जमखेडच्या जागेवर मंजुषा गुंड यांनी दावा केला आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्टी काय निर्णय घेणार आणि उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात घालणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.


कर्जत-जामखेड मतदार संघातील समस्या




  • कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या या मतदारसंघात कुकडीचे पाणी शेतीसाठी मिळावे ही 40 वर्षांपासूनची मागणी आहे.

  • दोन्ही तालुक्यात बेरोजगारांना हाताला काम मिळावे यासाठी औद्योगिक वसाहत होणे गरजेचे आहे. यासाठी जागा असूनही ती कागदावर आहे.


हे पारंपारिक प्रलंबित प्रश्न लोकसभा व विधानसभा निवडणुकीपुरते मर्यादित राहतात. आता मात्र मतदार व युवकांत जागृती झाली असल्यामुळे याचे उत्तर उमेदवाराला द्यावं लागणार आहे.


विधानसभा 2014 मतदानाची आकडेवारी




  • राम शिंदे (भाजप) - 84058

  • जयसिंग फाळके (राष्ट्रवादी) - 46164

  • रामेश खाडे (शिवसेना) - 46242


राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांच्या बरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मंजुषा गुंड यांनी देखील उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता पक्ष कोणाला उमेदवारी देताय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे हॅटट्रिक ओळख असलेल्या या मतदारसंघातून राम शिंदे हॅटट्रिक मारणार का? हे देखील येत्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.