सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली, देवगड, वैभववाडी तीन तालुके येतात. कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. कणकवली मतदार संघात 268 गाव येतात. नारायण राणे कणकवली-मालवण या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले. त्यानंतर 2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि त्यात कुडाळ-मालवण असा मतदारसंघ झाला. या 2009 साली कुडाळ-मालवण या मतदारसंघात नारायण राणे पुन्हा एकदा निवडून आले.
सलग सहाव्यादा विधानसभेत विक्रमी मताधिक्याने निवडून आल्यानंतर 2014 साली नारायण राणे यांचा बालेकिल्ला ढासळला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 10 हजार मताधिक्याच्या फरकाने नारायण राणे यांचा पराभव केला. 2009 च्या पुनर्रचनेनंतर कणकवली, देवगड, वैभववाडी असा विधानसभा मतदारसंघाची रचना झाली. मात्र 2009 च्या कणकवली विधानसभा मतदारसंघात राणेंनी काँग्रेसमधून रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली. मात्र रवींद्र फाटक यांचा 34 मतांनी पराभव झाला. त्यानंतर राणे यांचा बालेकिल्ला मानला जाणारा कणकवली मतदारसंघ 2009 साली भाजपच्या ताब्यात गेला. 2014 साली पुन्हा नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली. आणि राणे पुन्हा आपला बालेकिल्ला काबीज केला.
कणकवली विधानसभा मतदारसंघात देवगड तालुक्यात गाबीत समाजाचे वर्चस्व पाहायला मिळते. कारण देवगड तालुका हा समुद्र किनारी असल्याने याठिकाणी गाबीत समाजाचे प्राबल्य आहे. तर वैभववाडीत मराठा समाजाचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र या संपूर्ण कणकवली मतदारसंघात जातीय समीकरण बांधून एखादा उमेदवार निवडून येणे अशक्य आहे. 2019 च्या निवडणुकीत नितेश राणे कणकवली मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे नितेश राणे कणकवली मतदारसंघ राणेंचा बालेकिल्ला राखण्यात पुन्हा यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
नारायण राणे यांचा राजकीय वारसा चालवत नितेश राणे यांनी 2009 साली राजकारणात पाऊल ठेऊन पहिल्यांदाच कणकवली विधानसभा मतदारसंघात 25 हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने काँग्रेसकडून निवडून आले. 2014 साली भाजपच्या प्रमोद जठार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कणकवली कासार्डेत भव्य सभा घेऊनही भाजपचा उमेदवार निवडून आला नाही. 2014 साली काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना नितेश राणे यांनी 74 हजार 715 मत घेऊन निवडून आले होते. मात्र भाजपचे प्रमोद जठार यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी सभा घेऊनही केवळ 48 हजार 736 मत मिळाली. 25 हजार पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन नितेश राणे कणकवली मतदारसंघात विजयी झाले.
नारायण राणे शिवसेनेत असल्यापासून कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे कणकवलीचा राणेंचा बालेकिल्ला राखणार का? याकडे राजकीय क्षेत्रात लक्ष लागून आहे.
2009 विधानसभा निवडणूक मतदान
- प्रमोद शांताराम जठार (भाजप) - 57,651
- रवींद्र सदानंद फाटक (काँग्रेस ) - 57,617
- कुलदीप पेडणेकर (जनसुराज्य पक्ष ) - 24,566
- महेंद्र नाटेकर (अपक्ष) - 2,935
- सीताराम वासुदेव जाधव (बसपा)- 1,717
2014 विधानसभा निवडणूक मतदान
- नितेश राणे (काँग्रेस) 74,715
- प्रमोद जठार (भाजप) 48,736
- सुभाष मयेकर - 12,863
- अतुल रावराणे 8,196
2019 विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार
- नितेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
- प्रमोद जठार (भाजप)
- संदेश पारकर (भाजप)
- अरुण दुधवडकर (शिवसेना) युती न झाल्यास