औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे ज्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात तो मतदारसंघ फुलंब्री. या मतदारसंघात बागडे यांचा प्रभाव आहे. फुलंब्री मतदारसंघात भाजप यंदा कुणाला उमेदवारी देणार याची चर्चा मतदारसंघात अधिक पाहायला मिळत आहे. कारण हरिभाऊ बागडे यांच्या वयाचा निकष भाजप लावणार का? हाही प्रश्न आहे. 2014 च्या निवडणुकीतच ज्येष्ठत्वाचा निकष लावून बागडेंना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय पक्षपातळीवर झाला होता. मात्र शिवसेनेसोबत असलेली युती तुटली आणि बागडे यांना फुलंब्री विधानसभेचे तिकीट मिळालं. यावेळी देखील हरिभाऊ बागडे यांच्या वयाचा विचार होईल, असं अनेक जणांना वाटतं, त्यामुळे भाजपाकडून इच्छुकांची यादी मोठी आहे.


हरिभाऊ बागडे यांना 1984 पासून या मतदारसंघाचे आमदार केले. यात 2004 ते 2014 चा अपवाद आहे. मात्र, ऐनवेळी शिवसेनेशी युती तुटल्याने व दुसरा सक्षम उमेदवार न मिळाल्याने भाजपने हरिभाऊ बागडेंनाच उमेदवारी दिली. मात्र, पंचाहत्तरी पार केलेल्या नेत्यांना तिकीट न देण्याचा लोकसभेत कटाक्षाने नियम पाळणारा भाजप यावेळी बागडेंना उमेदवारी देणार की नवा चेहरा समोर आणणार, याविषयी साशंकता आहे.


फुलंब्री विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यात जरी असला तरी लोकसभेला तो जालना जिल्ह्यात येतो. या लोकसभा निवडणुकीमध्ये फुलंब्री मतदारसंघातून भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना भरघोस मतदान झालं. मात्र मोदी लाट असूनही हरिभाऊ बागडे यांचा केवळ 3513 मतांनी विजय झाला होता. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी हवी तेवढी सोपी दिसत नाही. त्यासोबतच भाजपाकडून इच्छुकांची भाऊगर्दी तिकीट न मिळाल्यामुळे वाढणारे नाराजी याचा फटका देखील फुलंब्री विधानसभा निवडणूक लढणार यांना बसेल हे निश्चित आहे.


चार वेळा या मतदारसंघातून भाजपाने बाजी मारल्यानंतर काँग्रेसनेही 2009 प्रमाणे पुन्हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचेच नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. भाजपातील अनेक नेत्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. हरिभाऊ बागडे यांच्या वयाची अडचण झाली आणि भाजपने उमेदवार बदलल्यास इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजपकडून हरिभाऊ बागडे, प्रदीप पाटील, नारायण फंड, भाऊसाहेब दहिहंडे, सुहास शिरसाठ, विवेक चव्हाण, अनुराधा चव्हाण, डॉ. गिरीश गाडेकर, भगवान घडमोडे, विजय औताडे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अनेक मंडळी उमेदवारीच्या आशेने भाजपत दाखल झाली आहे. त्यात काँग्रेसचे नामदेवराव गाडेकर, राष्ट्रवादीचे सुहास शिरसाठ, काँग्रेसचे शिवाजीराव पाथ्रीकर यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्वांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी जोराचे प्रयत्न सुरु आहेत. 2014 ला फुलंब्री मतदारसंघ हा शिवसेनेला सोडून घ्यावा यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे मागणी केली होती. युती तुटली आणि शिवसेनेकडून येथे उमेदवार उभा करण्यात आला. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून राजेंद्र ठोंबरे, बाबासाहेब डांगे. युती न झाल्यास अनुराधा चव्हाण शिवसेनेकडून किंवा वंचितकडूनही लढू शकतात.


काँग्रेसकडून कल्याण काळे, विजय औताडे, संदीप बोरसे, सुरेंद्र सोळुंके, राष्ट्रवादीतर्फे सुधाकर सोनवणे, मोतीलाल जगताप, राजीव पाथ्रीकर, बंटी देशमुख यांना देखील तिकीट मिळण्याची अपेक्षा आहे. हरिभाऊ बागडे यांचं साधं राहणीमान, लोकात मिसळण्याची सवय या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

2014 विधानसभा निवडणुकीत मतदानाची आकडेवारी




  • हरिभाऊ बागडे (भाजप) - 73068 मते

  • डॉ. कल्याण काळे (काँग्रेस) - 69555 मते

  • अनुराधा चव्हाण (राष्ट्रवादी) - 31878 मते

  • राजेंद्र ठोंबरे (शिवसेना) - 17518 मते



2019 लोकसभा निवडणुकीतील मतांचा आकडेवारी




  • रावसाहेब दानवे (भाजप) - 1,19,139 मते

  • विलास औताडे (काँग्रेस) - 66,279 मते


लोकसभा निवडणुकीतील मतांची आकडवारी पाहता भाजपाचे पारडे याठिकाणी जड आहे. असं असलं तरी काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघात काम करत आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत, त्यामुळे या मतदारसंघात काटे की टक्कर पाहायला मिळेल आणि भाजपाकडून तिकीट मिळवण्यासाठीची स्पर्धा देखील असेल.


मतदारसंघात शहरातील दहा वार्डचा समावेश आहे. या वार्डमध्ये अनेक समस्या आहेत. पाण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे. औरंगाबाद ते जळगावचे रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. याचा फटका अनेक गावांना बसत असल्याने लोक त्रस्त आहेत. शेद्रा डीएमआयसी, झालर क्षेत्राच्या विकासाचीही प्रतीक्षा अजून संपली नाही. समृद्धी महामार्गाचा बराचसा भाग या मतदारसंघातून जातो, त्यामुळे अनेक शेतकरी नाराज आहेत. जमिनीच्या मोबदल्यावरून अधिक नाराजी पाहायला मिळत आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत फुलंब्रीचा मतदार राजा कोणाला आमदार करतो हे पहावं लागेल.