नाशिक : कुलस्वामिनी रेणूका मातेच्या वास्तव्याने पावन झालेला आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कामांमुळे ऐतिहासिक असलेला तालुका म्हणजे चांदवड मतदारसंघ. अवर्षणग्रस्त अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणुका आजतागायत पाणी, सिंचनाच्या प्रश्नावर लढविल्या गेल्या. मात्र आजपर्यंत एकही योजना पुर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक ही पुन्हा याच प्रश्नाभोवती फिरते की विद्यमान आमदारांनी केलेल्या जलविकासाच्या कामांभोवती फिरणार की प्रांतवादावर जाणार हे येत्या निवडणूक प्रचारात स्पष्ट होईल.


चांदवड मतदारसंघात देवळा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. 1995 मध्ये माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी स्वतंत्र देवळा तालुक्याची निर्मिती केली होती. त्यानंतर तो चांदवड-देवळा मतदारसंघ या नावाने ओळखला जाऊ लागला.


भाजपाचा बालेकिल्ला अशी पूर्वीपासून ओळख असलेल्या या मतदार संघात 1985 ते 1999 पर्यंत भाजपाचे दिवंगत जयचंद कासलीवाल यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आपल्या काळात त्यांनी नांदगाव-चांदवड 42 खेडी पाणी योजना, चांदवड शहरासह 44 गाव पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात यश मिळविले. त्याच बरोबर शेतीसाठीच्या पाणी योजनांसाठी प्रयत्न केले.


1999 सालच्या निवडणुकीत मात्र त्यांना त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी शिरीष कोतवाल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. कोतवाल हे तसे मुळचे कॉंग्रेसचे मात्र 1999 साली त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत भाजपाचा बालेकिल्ला राष्ट्रवादीमय केला. याच काळात त्यांनी ऐतिहासिक खोकड तलावातील गाळ काढण्याच्या कामाला शुभारंभ केला आणि हे काम पाहण्यासाठी खुद्द शरद पवारांसह अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली. कोतवाल पॅर्टन म्हणून त्यावेळी तो बराच गाजला. याच काळात आघाडी सरकार फोडण्यात शिरीष कोतवालांचा सहभाग असल्याच्या कारणावरुन त्यांना त्याचा फटका 2004 च्या निवडणुकीत झाला.


2004 साली शिवसेनेचे तालुका प्रमुख उत्तमबाबा भालेराव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत त्यांनी चांदवड-देवळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केल. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत बऱ्याच घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा उत्तमबाबा भालेराव यांना उमेदवारी मिळाली, तर शिरीष कोतवाल यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजयश्री पुन्हा एकदा खेचून आणला.


2014 साली या मतदार संघात माजी मंत्री दौलतराव आहेर यांचे पुत्र डॉ. राहुल आहेर यांची एन्ट्री झाली. दौलतराव आहेर यांचं मुळ गाव हे देवळा असल्याने आपल्या कार्यकाळात त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले होते. तर वसाका कारखान्यावर त्यांनी सत्ता मिळविलेली होती. ग्रामपंचायत, पंचायत समिती या ठिकाणी आपल्या पुतण्या केदा आहेर याला राजकीय क्षेत्रात पुढे आणत देवळा तालुक्यावर वर्चस्व ठेवले होते. त्यामुळे या मतदारसंघासाठी नवख्या असलेल्या डॉ. राहुल आहेर यांना भाजपाकडून 2014 च्या निवडणुकीत उतरविण्यात आले. चुलत भाऊ केदा आहेर याची साथ आणि केलेली काम या जोरावर 2014 साली चांदवड-देवळा मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर विजयी झाले. या निवडणुकीत शिरीष कोतवाल यांचे सहकारी डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेत नशिब आजमाविण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फटका शिरीष कोतवाल यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला. निवडणुकीनंतर डॉ. कुंभार्डे यांनी भाजपात प्रवेश करत आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या मदतीने बाजार समिती ताब्यात घेत तालुक्यावर वर्चस्व निर्माण केले.


जलसंपदामंत्र्याच्या जवळचे असलेल्या डॉ. राहुल आहेर यांनी आपल्या कार्यकाळात तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची मोठी काम केली. तर चांदवड शहरासाठी असलेली नळपाणीपुरवठा योजना पुर्णत्वास नेली. राहुल पाटचारी, पुणेगाव पाटचारी यासह देवळा तालुक्यात भरीव विकास कामे त्यांनी केली. रस्त्यांची काम सध्या काही ठिकाणी सुरु आहे. या त्यांच्या जमेच्या बाजूसह चांदवड नगरपंचायत मध्ये भाजप-शिवसेनेचे वर्चस्व आहे.


2014 विधानसभा निवडणुकीतील मतदान




  • डॉ. राहुल आहेर (भाजप) - 54,944

  • शिरीष कोतवाल (काँग्रेस) - 43,785

  • डॉ.आत्माराम कुंभार्डे (अपक्ष) - 29,409


1985 पासून आज पर्यंतच्या प्रत्येक निवडणुका या पाणी प्रश्नाभोवती फिरत होत्या. सिंचनाच्या योजना सुरु झाल्या तर काही पुर्णत्वास जाऊ शकल्या नाही.


रखडलेल्या योजना


पुणेगाव कालवा, चणकापूर वाढीव कालवा, गिरणा उजवा कालवा, ओझरखेड कालवा याच बरोबर सर्वात महत्वाचा म्हणजे पुणेगाव कालव्याचे पाणी गळतीमुळे लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंत पोहचत नाही. या भागातील जनता आज या पाण्याची वाट पाहत असल्याने हा प्रश्न खुप महत्वाचा ठरला आहे.


एकूणच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भालेराव-कोतवाल हे जवळ आलेले असून, आमदार डॉ. राहुल यांच्यापुढे सक्षम पर्याय देण्यात येणार असल्याची चर्चा रंगताय. तर उमेदवार चांदवडचा की देवळाच्या असा प्रांतवाद पुन्हा रंगण्याची चिन्ह असली तरी ही निवडणूक पुन्हा एकदा पाणी प्रश्नाभोवती फिरणार का हे निवडणूकीच्या काळात दिसून येईल.