अहमदनगर : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांनी पराभूत करून विजय मिळवला आहे. 2014 पर्यंत अहमदनगर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. सध्याची टर्म सोडली तर त्याआधी सलग 5 टर्म शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड हे शिवसेनेकडून आमदार राहिले आहेत. त्यामुळे हा अहमदनगर शहर मतदार शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी सलग 5 टर्म निवडून येत अहमदनगर मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे ठेवली होती.


2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अमहदनगर शहर मतदार संघावर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती तुटल्याने शिवसेनेला मोठा फटका बसला. शिवसेना आणि भाजप दोघांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि युतीच्या मतांचे विभाजन झाले. याचा फायदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उभे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना झाला आणि संग्राम जगताप यांनी अनिल राठोड यांनी पराभूत करून विजय मिळवला.


अहमदनगर मतदार संघाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांचे सुपुत्र आहेत. संग्राम जगताप यांनी आमदार असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. मात्र काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांनी संग्राम जगताप यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला. या पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप काय करणार हा प्रश्न येताच संग्राम हे शिवसेनेत जाणार अशा चर्चांना उधाण आले. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेना पक्षात पक्षांतर केले आहे. याच धर्तीवर अहमदनगर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे देखील पक्षांतर करुन शिवसेनेत जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र संग्राम जगताप यांनी होणाऱ्या चर्चा अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.


अहमदनगर मतदारसंघात शिवसेनेकडून माजी आमदार अनिल राठोड यांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे संग्राम जगताप काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. करण संग्राम जगताप शिवसेनेत जाण्याच्या अफवा असल्याचे जगताप यांनी सांगितले असले तरी राष्ट्रवादीने घेतलेल्या मुलाखतींना संग्राम जगताप यांनी दांडी मारली आहे. तर माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी अहमदनगरमधून उमेदवारीची मागणी केली आहे.


विशेष बाब म्हणजे अहमदनगर महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपला पाठिंबा देत महापालिकेत भाजपचा महापौर आणि उपमहापौर निवडून दिला. महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळालेल्या असताना देखील दुसऱ्या स्थानावर असलेल्या राष्ट्रवादीने आमदार संग्राम यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या स्थानावर असलेल्या भाजपला पाठिंबा देत अभद्र युती केली आणि भाजपचा महापौर, उपमहापौर निवडून दिला. त्यामुळे अहमदनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन रंगत निर्माण होणार आहे.


अहमदनगर मतदारसंघातील समस्या




  • अहमदनगर शहरात MIDC चा महत्वाचा प्रश्न आहे. अनेक निवडणुकांमध्ये MIDC चा प्रश्न चर्चेला येतो, मात्र निवडणूक झाली की पुन्हा हा विषय बाजूला पडतो.

  • MIDC बरोबरच अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या उड्डाणपुलाचे 2 वेळेस भूमिपूजन झाले. मात्र उड्डाणपुलाच्या कामाला मात्र आद्यपही सुरुवात झाली नाही. औरंगाबादहून पुण्याला जाताना अहमदनगर शहरातून जावे लागते. त्यामुळे अपघात, वाहतुकीची कोंडी वारंवार होते. म्हणून हा उड्डाणपूल अत्यंत महत्वाचा आहे.

  • अहमदनगर शहरातील तिसरी महत्वाची समस्या आहे ती रस्ते. अहमदनगर मतदारसंघात रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था आहे.


 

विधानसभा निवडणूक 2014 मतदानाची आकडेवारी




  • संग्राम जगताप (राष्ट्रवादी) - 49378

  • अनिल राठोड (शिवसेना) - 46061

  • अभय आगरकर (भाजप) - 39913

  • सत्यजित तांबे (काँग्रेस) - 27076


दीड वर्षांपूर्वी अहमदनगरमधील केडगाव येथे 2 शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडमुळे नगर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिवसेना माजी आमदार अनिल राठोड आणि राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्यातील वातावरण देखील चिघळले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी तुरुंगवारी करावी लागली होती. आणि त्याचाच फटका म्हणून लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांना ज्या नगर शहरातून आमदार म्हणून मतदारांनी निवडून दिले तेथे सर्वात कमी मतदान झाले. त्यामुळे आता या निवडणुकीत मतदारांचा कौल संग्राम जगताप यांच्याकडे वळतो का हा देखील मोठा प्रश्न आहे.


विधानसभा 2019 च्या निवडणुकीत नगर मतदार संघातून शिवसेनेकडून अनिल राठोड हे इच्छुक उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीकडून घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दांडी मारली आणि नगरच्या जागेसाठी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उमेदवारीची मागणी केलीय. त्यामुळे आता विद्यमान आमदार संग्राम जगताप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.