अमरावती : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. नेतेमंडळी जाहीर सभांमधून एकमेकांवर टीका करत आहेत. त्यामध्ये, एमआयएमचे नेतेही महाराष्ट्रातील प्रचारात सक्रीय झाले असून असदुद्दीन ओवैसी (Asaduddin owaisee) यांनी अकोला आणि अमरावती येथे जाहीर सभा घेतली. त्यावेळी, बोलताना भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या वक्तव्यावरुन पलटवार केला. एक मौलाना म्हणाला, मला चार बायका आणि 19 मुलं आहेत. मी प्रत्येक हिंदू व्यक्तीला आव्हान करते की, ते 19 मुलं जन्माला घालत असतील तर आपण किमान चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, असे भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी म्हटलं होतं. आता, अमरावतीत निवडणूक प्रचार सभेदरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणांवर पलटवार केला आहे. तुम्ही चार नाही, आठ मुलं करा, आम्हाला काय करायचं, असे म्हणत नवनीत राणा यांनी हिंदूंना मुले जन्माला घालण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली.
अमरावती आणि औरंगाबादमध्ये काहीच होणार नाही, बडनेरामध्ये आपल्या सगळ्या जागा निवडून आल्या पाहिजे. जे काकांचे नाही झाले ते आपले काय होणार? आणि काहीजण म्हणतात अजितदादा आमचं काम करणार, आता घडीची वेळ गेली आणि पतंगची वेळ आली आहे, असे म्हणत ओवैसींनी अजित पवार यांच्यावर टीका केली. ही वेळ जागं होण्याची आहे, आपल्या मताचा योग्य वापर करा, तुम्ही आपल्या ताकदीने याठिकाणी सत्ता आणा. मला नेहमी म्हणतात, ही भाजपची बी टीम आहे, बी टीम आहे. पण, मी तर अल्लाचा पुतळा आहे असे ओवैसी यांनी म्हटले.
नवनीत राणांवर पलटवार
मोहन भागवत साहेब आपण लग्न केलं नाही. मग, लव्ह जिहाद म्हणजे काय? नागपुरात किती लव्ह जिहाद झाले, कायद्याचं काय झालं? असे प्रश्न ओवैसींनी अमरावतीतून विचारले. तसेच, कोणीतरी म्हणालं, याठिकाणी मौलाना किती मुलं करा म्हणतात तर 19 मुलं करतात म्हणे. मग, मौलाना यांना मला भेटावं लागेल. पण, तुम्ही चार नाही आठ करा, आम्हाला काय करायचं, असे म्हणत नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्यावरुन असदुद्दीन ओवैसी यांनी पलटवार केला. मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला, तुम्हाला मी सांगतो करा 19 मुलं, असेही ओवैसी यांनी म्हटले.
मी पुन्हा येणार
फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना तुम्ही सांगा की, येणाऱ्या निवडणुकीत आम्ही आमच्या मतांनी आमच्या लोकांना निवडून देऊ. कारण, ते फक्त आपल्या जातीसाठी लढत आहेत, असे ओवैसी यांनी म्हटले. तर, 12 तारखेला निवडणूक प्रचारासाठी मी परत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.