सातारा : सातारा जिल्ह्यातील कराडमधून आज महाआघाडीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधाने मोदींवर निशाणा साधाला. 56 इंच छाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तातून कुलभूषण जाधवांना सोडवून का आणत नाही, असा सवाल पवारांनी उपस्थित केला.
यासभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, खासदार उदयनराजे भासले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह इतर घटक पक्षातील नेते उपस्थित होते.
निम्म्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली नाही : शरद पवार
सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवर शरद पवारांनी टीका केली. सत्तेत असताना आम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्यावेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. सध्या शेतकऱ्यानी अवस्था बिकट आहे. मात्र या सरकारच्या काळात 50 टक्के शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळाली नाही, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
राफेलच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. विरोधक राफेलप्रकरणी चौकशीची मागणी करत आहे. मग मोदी राफेल प्रकरणी चौकशीला का घाबरत आहेत? असा सवालही शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला.
एअर स्ट्राईकवरुन सुरु असलेल्या राजकारणावरही पवारांनी आपलं मत मांडलं. देशाच्या संरक्षण दलांबाबत आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. यशवंतराव चव्हाणांनी देश मजबूत केला. विमानाचे कारखाने काढले, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र आताचे सरकार सैनिकांच्या पराक्रमाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहे असा आरोप पवारांनी यावेळी केला.
विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्ताननं अटक केल्यानंतर जगातील देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकला आणि त्यामुळे अभिनंदनची सुटका झाली, असा दाव पवारांनी केला. दरम्यान शहिदांच्या पराक्रमाचं राजकारण करु नका असंही शरद पवारांनी म्हटलं.
नरेंद्र मोदींवर टीका करताना शरद पवारांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला. तुझी जर 56 इंचाची छाती आहे, तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही. पाकिस्तानला गुपचूप शुभेच्छा का देता? सैनिकांच्या पराक्रमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असं पवारांनी म्हटलं.
मोदींनी फक्त 28 टक्के आश्वासनं पूर्ण केली : पृथ्वीराज चव्हाण
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान असणार नाहीत, हे मी राजकीय विश्लेषक म्हणून सांगत आहे, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. 2014 मध्ये भाजपला फक्त 36 टक्के मतं मिळाली होती. कारण विरोधकांची एकजूट नव्हती. यावेळी विरोधी पक्ष एकवटले आहेत. नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी फक्त 28 टक्के आश्वासनं पूर्ण झाली आहेत. महागाई वाढू नये म्हणून जाणिवपूर्वक शेतीमालाचे दर पाडले जात आहेत. गेल्या 45 वर्षातील बेरोजगारीचा सर्वाधिक दर मोदी सरकारच्या काळात आहे, असा भाजप सरकारच्या अपयशाचा पाढाचा पृथ्वीराज चव्हाणांनी ऐकून दाखवला.
रोज एकप्रकारे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार फोडला जात आहे. पण लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. साम, दाम, दंड, भेद या पद्धतीने मुख्यमंत्री काम करत आहेत. मतभेद विसरुन एकत्र या, बहुजन समाजाचा विचार टिकला पाहिजे. नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाणांनी यावेळी केल.
मोदींच्या आश्वासनाला जनता बळी पडली : उदयनराजे भोसले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनाला जनता बळी पडली. भाजपला मतदान करुन काय मिळालं, असा सवाल उदयनराजे भोसलेंनी विचारला. शेतकऱ्यांची अवस्था बदलायची असेल तर सत्तेत बदल करा. मी मीडियाला हात जोडतो की त्यांनी खरी परिस्थिती मांडावी, असं आवाहनही उदयनराजे भोसले यांनी यावेळी केलं.
शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीचा दाखला देत सरकारव टीका केली. सध्या सरकारविरोधी लाट देशात आहे. आत्ता अच्छे दिन नाही तर लुच्चे दिन सुरु आहेत. शेतकरी सन्मान योजना नाही तर शेतकरी अवमान योजना सरकारने सुरु केली आहे. दुष्काळ जाहीर होऊन तीन महिने होऊन गेले पण उपाययोजना झाल्या नाहीत. दुष्काळी भागात जनावरं विकले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात राजू शेट्टींनी सरकारवर केला.