भोपाळ : देशाचं हृदय म्हटलं जाणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्करनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. मंगळवारी (11 डिसेंबर) सकाळी आठ वाजता सुरु झालेली मतमोजणी आज (12 डिसेंबर) सकाळी 8.15 पर्यंत सुरु होती. अंतिम निकालात काँग्रेसला सर्वाधिक 114 जागा मिळाल्या. तर भाजप 109, बसपा 2, सपा 1 आणि अपक्षांना 4 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेस राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी दावा केला असून भाजपही दावा करण्याच्या तयारीत आहे.


मध्य प्रदेशातील मजमोजणी पूर्ण, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले कमलनाथ यांनी सत्ता स्थापनेबाबत राज्यपालांना पत्र लिहिलं. आम्हाला सत्ता स्थापनेसाठी संधी दिली जावी, जेणेकरुन आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करुन. आम्हाला अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे, असं कमलनाथ यांनी पत्रात लिहिलं आहे.

दुसरीकडे आम्ही राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे, असं भाजपने म्हटलं आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत नाही. अनेक अपक्ष आणि अन्य आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. उद्या (बुधवार) आम्ही राज्यपालांना भेटू, असं ट्वीट भाजपचे प्रदेशाध्य राकेश सिंह यांनी म्हटलं आहे. भाजप बहुमतापासून सहा जागा दूर आहे.


तसंच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक बोलावली असून त्यात निकालावर चर्चा होणार आहे. या बैठकीला कैलाश विजयवर्गीय, विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते.

मध्य प्रदेशात काँग्रेसचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरु, राज्यपालांकडे मागितली वेळ

मामा' नावाने ओळखले जाणारे शिवराज सिंह चौहान मागील 13 वर्षांपासून मध्‍य प्रदेशचे मुख्यमंत्री आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधी, कमलनाथ, ज्‍योतिरादित्‍य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांनी यंदा मध्य प्रदेशात जोरदार प्रचार केला होता. सत्ताविरोधी लाटेतही शिवराज सिंह चौहान यांनी राजस्‍थान आणि छत्तीसगडच्या तुलनेत चांगली कामगिरी केली.