मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने काँग्रेला पाठिंबा जाहीर केला आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानेही काँग्रेसला समर्थन दिलं आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदारांनीही काँग्रेसला समर्थन दिलं आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजीनामा देत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचं चौहान यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे किंवा ज्येष्ठ नेते कमल नाथ यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा देण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांचा परिचय
*राजकीय परंपरेचा वारस आणि राजकीय परंपरेनेच विरोधकही घरातच दिले
*ग्वाल्हेरच्या शिंदे राजपरिवरात जन्म, वय 47 वर्षे
*काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मंत्री, गांधी परिवाराशी जवळीक असलेल्या माधवराव शिंदे यांचे एकुलते एक पुत्र
*विरोधकही घरातच. आजी राजमाता विजयराजे शिंदे आणि आत्या नुकत्याच राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडलेल्या वसुंधरा राजे शिंदे या दोघीही भाजपमध्ये
*माधवरावांच्या अकाली मृत्यूनंतर ज्योतिरादित्य यांनी 2002 मध्ये पहिल्यांदा मध्य प्रदेशच्या गुणातून लोकसभा निवडणूक जिंकली
*ज्योतिरादित्य त्यानंतर प्रत्येक लोकसभा निवडणूक जिंकले आहेत, एकूण चारवेळा त्यांनी खासदारकी मिळवली आहे
*यूपीए सरकार असताना अनेक राज्यमंत्रीपदे भूषवली
*खास इंटिग्रेटेड विजेच्या ग्रीड निर्मिती प्लानमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा मानला जातो
*महाराज म्हणून अजूनही ग्वाल्हेरमध्ये त्यांना संबोधलं जातं. यूपीए मधील ते सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत आहेत.
*माधवराव शिंदेंच्या 20 हजार कोटींच्या संपत्तीचा वारस म्हणून सध्या ते आपल्या आत्याविरोधात कोर्टात आहेत
*ज्योतिरादित्य अत्यंत उच्चशिक्षितही आहेत, डूनमध्ये शाळा शिकल्यावर त्यांनी हार्वर्डमधून इक्नॉमिक्स आणि स्टॅनफर्डमधून एमबीए केले आहे
*ज्योतिरादित्य यांचं लग्न बडोद्याच्या गायकवाड घराण्यातील प्रियदर्शिनी यांच्याशी झालं आहे
*ज्योतिरादित्या यांचे स्वतःचे गांधी परिवाराशी अत्यंत निकटचे संबंध आहेत. ते राहुल गांधी यांचे जवळचे मित्र मानले जातात. त्यांच्या या जवळीकीमुळे अनेक वेळा कमलनाथ अस्वस्थ होतात, असंही सांगण्यात येतं.
*मध्य प्रदेशच्या तरुणांमध्ये ज्योतिरादित्य यांची जबरदस्त क्रेझ आहे
कमलनाथ यांचा परिचय
* 72 वर्षीय कमलनाथ हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
* 9 वेळा छिंदवाडा या मतदारक्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले आहेत
* सर्वात जास्त वेळा खासदार राहिलेल्या नेत्यांपैकी एक
* काँग्रेस सत्तेत असताना अनेक मंत्रीपदे हाताळली, त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट
* कमलनाथ यांना 'भाईजी' म्हटलं जातं. शिकारपूर हे त्यांचे घर आहे, तिथूनच सत्तेत कोणीही असो, सूत्र मात्र छिंदवाडा परिसरातूनच हलतात
* कमलनाथ यांना मे 2018 मध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनवून पक्षाला जिंकवण्याची धुरा राहुल गांधी यांनी सोपवली
* अत्यंत चाणाक्ष, मॅनेजमेंट एक्स्पर्ट आणि राजकीय सेटिंगमध्ये कमलनाथ माहीर मानले जातात
* कमलनाथ यांच्याबद्दल बोलताना किसानपुत्र विरुद्ध उद्योगपती अशी शिवराज सिंग यांची पिच असायची
* अनेक शाळा, कॉलेज आणि उद्योगांचे ते मालक आहेत
मध्य प्रदेशातील पक्षीय बलाबल (230)
काँग्रेस 114
भाजप 109
बसप 2
सप 1
इतर 4