पंढरपूर : चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं प्रत्युत्तर माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी दिलं आहे. संजय शिंदेंनी भाजपशी गद्दारी केली असून त्याची किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं होतं.

आपण कधी भाजपमध्ये प्रवेशच केला नव्हता, त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आणि आपण कोणाच्या धमकीला घाबरत नाही अशी सणसणीत चपराक संजय शिंदे यांनी लगावली. संजय शिंदे हे भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर संजय शिंदे राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले होते.

संजय शिंदे यांनी पक्षाशी गद्दारी केली असून त्यांना किंमत मोजावी लागेल, असा गर्भित इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला होता. संजय शिंदे हे गेली साडेचार वर्षे भाजपच्या सोबत होते. त्यांनी भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही मिळवलं होतं. मात्र राष्ट्रवादीने माढा लोकसभेची उमेदवारी देताच शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शिंदे यांच्याकडून दगाफटका झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या जिव्हारी लागल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी संजय शिंदेंना सुनावलं.
भाजप ठरवेल त्याला निवडून देऊ, मोहिते पाटलांच्या वक्तव्यावर रणजितसिंह निंबाळकर म्हणतात...

तुमच्याकडे येणारे नेते कोणत्या तरी भानगडीत अडकलेले असतील, पण मी अशा कोणत्याही स्कॅम किंवा आर्थिक घोटाळ्यात अडकलेलो नाही. त्यामुळे मी कोणाच्या धमक्यांना भीत नाही. माझ्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात भाजप ग्रामीण भागात पोहचायला सुरुवात झाली होती, असा टोलाही संजय शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

VIDEO | मी गद्दारी केली नाही, तुमच्या धमक्यांना घाबरत नाही, संजय शिंदेंचं चंद्रकांत पाटलांना उत्तर



राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील सर्व आमदार आणि प्रतिनिधींची बैठक जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या सोनके येथील फार्म हाऊसवर झाली. यासाठी आ. रामराजे निंबाळकर, आ. गणपतराव देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके यांच्यासह रश्मी बागल, प्रभाकर देशमुख आणि मतदारसंघातील इतर मान्यवर नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना संजय शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांच्या धमकीचा समाचार घेतला.

आपण तीन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असून भाजपकडून कोणीही उमेदवार असला, तरी आमची तयारी झाली असल्याचं संजय शिंदेंनी सांगितलं. या बैठकीला काँग्रेसचे आमदार जीवन गोरे, कल्याण काळे यांनी दांडी मारल्याने आघाडीतही सारे आलबेल नसल्याचं चित्र आहे.