Madha Lok Sabha Election Result 2024 : माढा लोकसभेचा खासदार कोण होणार? हे पुढच्या काही तासातच स्पष्ट होईल. भाजपचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये थेट लढत आहे. एक्झिट पोलमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं सांगितलं गेले. पण भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना विजयाचा विश्वास आहे. धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर हे मतमोजणीसाठी सोलापूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही आहेत. 


माढा लोकसभेसाठी भाजपने दुसऱ्यांदा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटील यांनी बंडखोरी केल्याने माढा लोकसभेची खूप चर्चा झाली. मात्र गेल्या पाच वर्षात पंतप्रधान मोदी यांनी केलेली कामे, जारंगे यांच्या आंदोलनामुळे अनपेक्षित मिळणारी ओबीसी मते यामुळे निवडणूक खूप चुरशीची झाली. फलटण, माण खटाव , सांगोला या भागातून मिळणारे मताधिक्य ही जमेची बाजू असून माढा व करमाळा या दोन तालुक्यातून भाजपाच्या जोडीला अजितदादा गटाचे आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांनीही ताकद पणाला लावल्याने या दोन मतदारसंघात देखील चांगले मताधिक्य मिळण्याची आशा निंबाळकर यांना आहे. मोहिते पाटील व उत्तम जानकर एकत्र आल्याने माळशिरस तालुक्याचे मताधिक्य कमी करण्यावर निंबाळकर व भाजपने प्रयत्न केले होते. एक्झिट पोलमध्ये पराभूत दाखवत असलेल्या निंबाळकर यांना मोदी करिष्म्यावर आशा आहे. 


रणजित निंबाळकर काय म्हणाले ?


एक्झिट पोल काही दाखवत असले तरी गेल्यावेळीपेक्षा जास्त मताने विजयी होण्याचा दावा रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. आपण दुष्काळी भागासाठी केलेली पाण्याची कामे असोत किंवा मतदारसंघासाठी हायवे, रेल्वेची कामे असोत  जनतेने आपल्याला भरभरून मतदान केल्याने गुलाल आमचाच असेल असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केलाय. 


धैर्यशील मोहिते पाटील यांनी पहाटे देवाचे दर्शन घेवून मतमोजणी केंद्राकडे निघाले 


माढा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्या धैर्यशील यांना पक्षाने तिकीट नाकारले व विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना तिकीट दिले होते. यानंतर भाजपला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करीत हाती तुतारी घेत ही निवडणूक लढवली. अतिशय अटीतटीची झालेली ही निवडणूक राज्यात जास्त चर्चेत राहिली होती.


धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले ?


मला सुरुवातीपासूनच विजयाचा विश्वास होता त्यामुळे आज कोणताही ताण तणाव नाही. त्यात जनतेने शरद पवार व विजयदादा यांच्या बाजूने कौल दिल्याने मी 35 ते 80 हजाराच्या फरकाने विजयी होणार. सर्व एक्झिट पोलने मीच विजयी होणार हे दाखवले आहे. समोरच्या उमेदवाराने मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन केल्याने थोडे मताधिक्य कमी झाले एवढेच. राज्यात आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील, असे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.