मुंबई : लोकसभेच्या निकालावर आज पावसाचं (Maharashtra Weather Forecast) सावट आहे. महाराष्ट्रात मान्सूनची (Monsoon) चाहूल लागली असून अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पाऊसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासात राज्यात विविध भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात उष्णतेमुळे नागरीक हैराण झाले आहेत. आजही मुंबईकरांना दिलासा मिळण्याची आशा नाही. आज कोकण, विदर्भ आणि मरठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता 


महाराष्ट्रात पुढील दिन दिवसात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. यंदा केरळमध्ये मान्सून लवकर दाखल झाल्याने राज्यात मान्सून लवकर पोहोचेल असा अंदाज आहे. आज आणि उद्या दोन दिवसात राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


महाराष्ट्रात या जिल्ह्यात पाऊस पडणार


भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टी, मराठवाडा आणि विदर्भात पावसामुळं तापमानात घट होण्याची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या भागातही पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकणात काही ठिकाणी आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


मुंबईसह कोरडे वातावरण 


मुंबईसह पालघर जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज, हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सातारा या भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात पावसाची शक्यता आहे. 


मान्सून कुठे पोहोचला?


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून सध्या कर्नाटकक्या काही भागात दाखल झाला असून पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात पोहोचण्याची अपेक्षा आहे नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्र उर्वरित भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, गोवा, उर्वरित रायलसीमा, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशाचा काही भाग, पश्चिम मध्य प्रदेशाचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागर, या भागात पुढील चार ते पाच दिवसांत दाखल होण्याचा अंदाज आहे . मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.