पालघर लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात, पण 'नोटा' तिसऱ्या क्रमांकावर
एबीपी माझा वेब टीम | 25 May 2019 09:12 AM (IST)
पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थेच्या नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय मतदारांना 'नन ऑफ द अबॉव्ह' म्हणजे 'नोटा' हा नकाराधिकार वापरण्याचा हक्क मिळाला.
वसई : राज्यात काही ठिकाणी वंचित फॅक्टरमुळे काँग्रेसला फटका बसल्याचं चित्र असताना, पालघर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी नोटा पर्यायाला मोठी पसंती दिल्याचं समोर आलं आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित, बहुजन विकास आघाडी बळीराम जाधव यांच्यापाठोपाठ नोटा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर राहिला. नोटा तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे विजयी उमेदवार राजेंद्र गावित यांना 5,80,479 मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावरील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 4,91,596 मतं मिळाली. त्याचवेळी 'नोटा'ला 29,479 मतं मिळाली. या निवडणुकीत बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी तसंच अपक्ष धरुन 13 उमेदवार रिंगणात होते. तरीही मतदारांनी 'नोटा'ला अधिक पसंती दिली. यंदा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी झाली होती. त्यामुळे स्वतंत्र विचारसरणीचे अनेक मतदार यावेळी जोडले गेले होते. राजेंद्र गावित हे 88,883 मतांनी निवडून आले आहेत. मात्र नोटाला मतदारांनी एवढी पसंती दिल्याने राजकीय तर्क-विर्तक सध्या लढवले जात आहेत. 'नोटा'चा पर्याय का? खरंतर पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थेच्या नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय मतदारांना 'नन ऑफ द अबॉव्ह' म्हणजे 'नोटा' हा नकाराधिकार वापरण्याचा हक्क मिळाला. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी टाळाटाळ होऊ नये, लोकशाहीतल्या 'निवडणूक' या विषयावर नाराज असलेल्या लोकांनीही मतदानाचा अधिकार बजवावा, असा त्यामागचा उद्देश होता. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघात नोटा तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने निवडणुकीविषयी मतदारांच्या मानसिकतेचाही विचार होत आहे. पालघर मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मतं 1. राजेंद्र गावित (शिवसेना) : 5,80,479 2. बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी) : 4,91,596 3. नोटा : 29, 479 4. संजय तांबडा (बहुजन समाज पार्टी) : 13446 5. कॉम्रेड शंकर बदादे (मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) - 11918 6. सुरेश पाडवी (वंचित बहुजन आघाडी) : 13,728 7. संजय कोहकेरा (बहुजन मुक्ती पार्टी) : 6185 8. दत्ताराम करबट (अपक्ष) : 13932 9. भोंडवे ताई मारुती (अपक्ष) :5304 10. राजू लडे (अपक्ष) : 10218 11. विष्णू पाडवी (अपक्ष) : 9904 12. स्वप्नील कोळी (अपक्ष) :7539 13. देवराम कुरकूटे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया) :8213 एकूण वैध मतं - 11,72,462 अवैध मतं - 256 पोस्टल मतं - 1011 (वैध मतं - 739, अवैध मतं - 256) एकूण मतदान - 12,02,197