राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार ही चोर है' अशी घोषणा दिली होती. या घोषणेला भाजपनेही उत्तर दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मार्च रोजी त्यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून 'चौकीदार नरेंद्र मोदी' असं केलं होतं. मोदींनंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी तसंच समर्थकांनीही ट्विटरवर आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावलं होतं.
मात्र आज निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नावापुढचा 'चौकीदार' शब्द हटवला. पहिल्या ट्वीटमध्ये मोदी म्हणाले की, "भारताची जनता आता चौकीदार झाले आणि देशाची सेवा केली. जातीवाद, सांप्रदायिकता, भ्रष्टाचाराच्या संकटातून भारताचं रक्षण करण्यासाठी चौकीदार एक शक्तिशाली प्रतीक बनला आहे."
पुढच्या ट्वीटमध्ये मोदी लिहितात, "चौकीदार स्पिरिट नवीन स्तरावर घेऊन जाण्याची वेळ झाली आहे. हे स्पिरिट प्रत्येक क्षणाला जिवंत ठेवा आणि भारताच्या प्रगतीसाठी काम सुरु ठेवा. ट्विटर हॅण्डलवर माझ्या नावापुढील 'चौकीदार' शब्द हटवत आहे. पण तो माझा अविभाज्य भाग राहिल. तुम्हा सर्वांनाही विनंती आहे की, तुम्हीही तो शब्द हटवा."
पंतप्रधान मोदी यांच्या नावात 'चौकीदार' शब्द जोडल्यानंतर भाजपनेही 'मैं भी चौकीदार' अभियान सुरु केलं होतं. या अंतर्गत भाजपचे नेते, मंत्री, लाखो कार्यकर्ते आणि समर्थकांनी ट्विटरवर आपल्या नावाच्या पुढे चौकीदार शब्द लावला होता. एवढंच नाही तर निवडणूक प्रचाराच्या वेळी ही घोषणा असलेले टी-शर्ट आणि टोपीही कार्यकर्त्यांनी घातली होती.