पाटणा : देशातील लोकसभा निवडणुकांचे आकडे हाती येत असताना अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. त्यामुळे, राजकीय हालचालींना वेग आला असून बिहारमधील (Bihar) राजकारण वेगळ्या वळणावर जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत म्हणजेच दुपारी 2 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला 298 धावांची आघाडी दर्शवत असून इंडिया आघाडीला 226 जागांवर आघाडी दिसून येत आहे. त्यामुळे, देशात सत्तास्थापनेच्या घाडमोडी वेगाने घडत असून बडे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार (Nitish kumar) यांना थेट उपपंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचे समजते.

  


लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशातील राजकीय घडामोडी बदलत असल्याचे चित्र आहे. देशात महत्त्वाची राज्य असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र राज्यात भाजप आघाडीच्या जागा घटल्या आहे. त्यामुळे, नितीश कुमार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच नितीश कुमार यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना भेट नाकारल्याने त्यांच्या भूमिकेवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतील बडे नेते नितीश कुमार यांच्या संपर्कात असून नितीश कुमार यांना थेट पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे, पुढील काही दिवसांत बिहारसह देशातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे दिसून येत आहे. 


दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे पुढची रणनीती ठरवण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे भाजप सरचिटणीस विनोद तावडेंच्या भेटीला गेले आहेत. तर, भाजपने संख्याबळासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांना फोन केल्याची माहिती आहे. 


आजचा निकाल: बिहार लोकसभा 40 जागा - पक्षीय बलाबल 


जनता दल - Janata Dal (United) - JD(U)   14 जागांवर आघाडी


भाजप - Bharatiya Janata Party - BJP 13 जागांवर आघाडी


लोक जनशक्ती पार्टी Lok Janshakti Party(Ram Vilas) - LJPRV - पाच जागांवर आघाडी


राष्ट्रीय जनता दल - Rashtriya Janata Dal - RJD  - तीन जागांवर आघाडी


काँग्रेस - Indian National Congress - INC  दोन जागांवर आघाडी 


सीपीआय - Communist Party of India (Marxist-Leninist) (Liberation) - CPI(ML)(L)   - एक जागेवर आघाडी


Hindustani Awam Morcha (Secular) - HAMS   - एक जागेवर आघाडी


दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वी नितीश कुमारांनी भाजपसोबत जाऊन आघाडी केली. त्यानंतर, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. मात्र, आता इंडिया आघाडीकडील निकालाचे कल पाहाता नितीश कुमार पुन्हा इंडिया आघाडीसोबत येतात की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच, नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री चौधरी यांनाच भेट नाकारल्याने ह्या चर्चांना अधिकची बळकटी मिळाली आहे. 


महाराष्ट्रात 30 जागांवर आघाडी


महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 30 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आघाडी असल्याचे दिसून येते. तर, महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. बहुतांश जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवारांना मोठी आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.