मुंबई : ईशान्य मुंबईत खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवरुन शिवसेना-भाजपमध्ये अद्यापही चर्चा सुरु आहे. आता यामध्ये आरपीआय आठवले गटाने देखील उडी घेतली आहे. घाटकोपरमध्ये आरपीआय आठवले गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत रामदास आठवले यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली.


खासदार किरीट सोमय्या यांनी आरपीआयच्या एकाही कार्यकर्त्याची कामे केली नाहीत. तसेच त्यांच्या उमेदवारीवरुन सेना-भाजपमध्ये संभ्रमावस्था असल्यामुळे ईशान्य मुंबई उमेदवारीची जागा रामदास आठवलेंना मिळावी अथवा आम्ही 'नोटा'चा पर्याय वापरु अशी भूमिका आरपीआय कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली आहे.


ईशान्य मुंबईतील सोमय्या यांच्या उमेदवारीवरुन शिवसेना-भाजप यांच्यातील मतभेद समोर येत आहेत. या मतदारसंघातील वादाचा परिणाम आजूबाजूच्या अनेक मतदारसंघांवर होऊ शकतो. या जागेचा तिढा सुटत नसेल तर ही जागा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सोडावी. ईशान्य मुंबई मतदारसंघात आरपीआयला मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे याठिकाणी रामदास आठवले यांनी निवडणून लढवली तर ते निश्चित निवडूण येतील, असा विश्वास आरपीआयचे राष्ट्रीय महासचिव अविनाश म्हातेकर यांनी व्यक्त केला.


ईशान्य मुंबईच्या जागेसाठीच्या शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोधा आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईतून भाजपकडून मनोज कोटक, पराग शाह, प्रकाश मेहता आणि प्रविण छेडा यांची नावं चर्चेत आहेत.