मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीने आपल्या लोकसभेच्या जागा घोषित केल्यानंतर भाजपच्याही लोकसभा उमेदवारांची पहिली यादी 16 मार्चला जाहीर होणार आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर राज्यात एकूण 25 जागांवर भाजपचे उमेदवार लढणार आहेत.


त्यापैकी 17 ते 18 नावं पहिल्या यादीत जाहीर होणार तर उर्वरित जागांवर अजूनही खल सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात भाजपकडून 5 ते 6 जागांवर उमेदवार बदलण्याचा विचार सुरु असल्याचेही समोर आले आहे. यामध्ये सोलापूर, दिंडोरी, गडचिरोली-चिमूर, माढा, नांदेड आणि अर्थात अहमदनगर दक्षिण या जागांचा समावेश आहे.

VIDEO | लोकसभा उमेदवारीसाठी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची बैठक | मुंबई | एबीपी माझा



भाजपच्या कोट्यातून मित्रपक्षाला फक्त 1 किंवा 2 जागा सुटणार असल्याची देखील चर्चा आहे. दिल्लीत संसदीय बोर्डाच्या बैठकीला उमेदवारांच्या नावांवर होणार शिक्कामोर्तब आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि विजय पुराणिक हजेरी लावणार आहेत. या बैठकीनंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल.

लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर
दरम्यान, आज लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर झाली. आयोजित पत्रकार परिषदेत हि यादी जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, हेमंत टकले उपस्थित होते.

ही पहिली यादी असून उर्वरित यादी उद्या आणि परवा घोषित करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

या पत्रकार परिषदेत मावळ, माढा, अहमदनगर, बीड, गोंदिया येथील उमेदवारांची घोषणा मात्र झालेली नाही. काही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अदलाबदली करण्याचे चालले आहे, त्यावर चर्चा सुरु असल्याचे देखील ते म्हणाले.

या यादीमध्ये महाराष्ट्रातील 10 आणि लक्षद्वीपमधील 1  अशा 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर हातकणंगले लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे निश्चित असलेल्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मावळमधून पार्थ पवारांच्या नावाची घोषणा होईल, अशी शक्यता होती, मात्र त्यांच्या उमेदवारीवरुन सस्पेन्स अजूनही कायम आहे.

राष्ट्रवादीने बुलडाणा लोकसभेतून राजेंद्र शिंगणे यांच्या नावाची घोषणा केली आहे. या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासून आग्रही आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देत हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने सोडली असली तरी स्वाभिमानी अजून 2 जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे यावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तोडगा कसा काढणार याकडे आता लक्ष लागून आहे.


उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ

ईशान्य मुंबई  - संजय दीना पाटील
बारामती - सुप्रिया सुळे
बुलडाणा - राजेंद्र शिंगणे
सातारा - छत्रपती उदयनराजे भोसले
कोल्हापूर - धनंजय महाडिक
जळगाव - गुलाबराव देवकर
रायगड- सुनील तटकरे
ठाणे - आनंद परांजपे
परभणी -  राजेश विटेकर
कल्याण - बाबाजी पाटील
लक्षद्वीप - मोहम्मद फैजल


हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा



लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी काल जाहीर झाली. 21 उमेदवारांच्या या यादीत महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाचीही घोषणा झाली. या दुसऱ्या यादीत उर्वरित सर्व 16 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. यामध्ये नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध पटोले अशी लढत रंगणार आहे. दरम्यान दुसऱ्या यादीतही प्रियांका गांधी यांचं नाव आलेलं नाही.



काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या यादीत नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उत्तर-मध्यमधून प्रिया दत्त, मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, गडचिरोली-चिमूर येथून डॉ. नामदेव उसेंडी यांना काल उमेदवारी जाहीर केली.



उत्तर प्रदेशातील असून यामध्ये नगिना येथून ओमवती देवी जटाव, मोरादाबाद येथून राज बब्बर, खेरीतून जाफर अली नक्वी, सितापूरमधून कैसर जहाँ, मिसरिख येथून मंजरी राही, मोहनलाल गंज येथून रामशंकर भार्गव, सुल्तानपूर येथून डॉ. संजय सिंह, प्रतापगढ येथून रत्ना सिंह, कानपूरमधून श्रीप्रकाश जैस्वाल, फतेहपूर येथून राकेश सचन, बहारिचमधून सावित्रीबाई फुले, संत कबीर नगर येथून परवेझ खान, बंसगाव येथून कुश सौरभ, लालगंजमधून पंकज मोहन सोनकर, मिर्झापूर येथून ललितेश त्रिपाठी आणि रॉबर्ट्सगंज येथून भगवती प्रसाद चौधरी या उमेदवारांची नावे काल जाहीर करण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 7 मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली होती.  यात 15 उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या होत्या.  पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
VIDEO : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून लढणार



पहिल्या यादीत काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या 15 जागांपैकी 11 जागा उत्तर प्रदेशातील तर चार जागा गुजरातमधील होत्या. सलमान खुर्शीद हे फरुखाबादमधून नशीब आजमावणार आहेत.



राहुल गांधी अमेठीतून, सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा झाली असली तरी प्रियांका गांधी यांचं नाव तूर्तास यादीत आलेलं नाही. प्रियांका गांधी यांच्या प्रवेशानंतर सोनिया लोकसभा लढणार की नाही याबद्दल साशंकता होती, मात्र त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.