PAK vs AFG: पहिल्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर आफगाणिस्तानच्या खेळाडूंनी दमदार कमबॅक केलेय. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. आफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात ३०० धावांपर्यंत मजल मारली. आफगाणिस्तानचा सलामी फलंदाज गुरबाज याने दीडशतकी खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानला विजयासाठी 301 धावांचे आव्हान मिळाले आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान या सलामीच्या जोडीने पहिल्या 10 षटकांत कोणताही बिनबाद 48 धावांपर्यंत मजल मारत संघाला चांगली सुरुवात करून दिली.
यानंतर दोघांनीही वेगाने धावसंख्या वाढवण्यावर भर दिला. गुरबाज आणि जद्रान यांच्यात पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची मोठी भागीदारी पाहायला मिळाली. पाकिस्तानविरुद्ध 2010 नंतर वनडे फॉरमॅटमध्ये कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली. या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तान संघाला 50 षटकांत 300 धावा करता आल्या. गुरबाजशिवाय इब्राहिम झद्रानने 80 धावांची खेळी केली. दुसरीकडे पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 2 तर नसीम शाह आणि उस्मा मीरने 1-1 विकेट घेतली.
गुरबाजच्या नावावर विक्रम -
श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने आक्रमक फलंदाजी केली. या युवा यष्टीरक्षक फलंदाजाने या सामन्यात केवळ 122 चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील 5 वे शतक ठोकले. गुरबाज पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. रहमानउल्ला गुरबाजने 25 व्या डावात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 5 वे शतक झळकावले. यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५ शतके झळकावणारा गुरबाज आता जागतिक क्रिकेटमधील तिसरा फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आणि पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली 5 शतके पूर्ण करण्यासाठी दोघांनी 19-19 डाव खेळले होते.