नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. भाजपचा विजय जवळपास निश्चित आहे. एनडीएने(भाजप आणि मित्रपक्ष ) सध्या 349 जागांवर आघाडी मिळवली आहे. बहुमताचा टप्पा भाजपने केव्हाच पार केला असल्यामुळे देश-विदेशातून मोदींना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मोदींना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सहवागचाही समावेश आहे.


विरुने ट्वीट करुन नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. विरुने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय जनतेने मोदींच्या बाजूने त्यांचा कौल दिला आहे. या ऐतिहासिक विजयासाठी मोदींचे अभिनंदन. मोदीजी तुमची दुसरी इनिंग आताच्या इनिंगपेक्षा अधिक चांगली होऊ देत. त्याद्वारे देशाचा विकास होऊ देत. जय हिंद." या ट्वीटसोबत विरुने मोदींनी सुरु केलेल्या #विजयीभारत हा हॅशटॅगही वापरला आहे.

दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 343 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 89 जागांवर आघाडी मिळाली आहे. 110 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्रातील 48 जागांचा विचार केला तर भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 1 आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे. देशभरात बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.


मोदींनी विजयी झाल्यानंतर ट्वीट करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत" (सर्वांची साथ + सर्वांचा विकास + सर्वांचा विश्वास = विजयी भारत)

मोदींनी त्यानंतर अजून एक ट्वीट करुन देशातील नागरिकांचे आभार मानले आहेत. नागरिकांना उद्देशून मोदींनी म्हटले आहे की, "तुम्ही आमच्यावर आणि आमच्या मित्रपक्षांवर विश्वास ठेवलात याबद्दल सर्व भारतीयांचे आभार. तुमचा हाच विश्वास आम्हाला देशाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ताकद देईल."

मोदी म्हणतात की, "मी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला त्याच्या परिश्रमांसाठी वंदन करतो. आमचा प्रत्येक कार्यकर्ता मतं मागण्यासाठी लोकांच्या घरोघरी गेला, आमचा अजेंडा लोकांसमोर मांडला. त्यामुळेच आम्ही लोकांपर्यत पोहोचलो."