भिवंडी : भिवंडी लोकसभा क्षेत्रात भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्या कार्यकाळात भाजपा-शिवसेना या दोन पक्षांतील कार्यकर्त्यांमधील दुरावा वाढत गेला होता. युतीच्या घोषणेनंतरही भिवंडी लोकसभा क्षेत्रात शिवसेना लोकप्रतिनिधी, शिवसैनिक हे निवडणुकीपासून दोन हात लांब असल्याचं चित्र होतं. लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांची समजूत काढावी लागत आहे.


ठाणे जिल्ह्यातील एकमेव भिवंडी लोकसभा ही भाजपच्या वाट्याला आली आहे. तेथे पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कपिल पाटील यांच्या उमेदवारीवरुन शिवसेना गोटातून तिखट प्रतिक्रिया उमटत होत्या. शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे यांनी तर उघड बंद पुकारत काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला.


तर भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या 47 पैकी 42 नगरसेवकांनी सुरेश म्हात्रे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन केली. या पार्श्वभूमीवर उमेदवार कपिल पाटील यांनी व्यासपीठावरुन साडेचार वर्षात झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि जोमाने कामाला लागण्याचं आव्हान युतीतील कार्यकर्त्यांना केलं.


या सभेत बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही पक्षात समन्वय राखणे गरजचे असल्याचे सांगितले. आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही सांभाळा आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या, असा सल्ला एकनाथ शिंदेनी यावेळी कपिल पाटलांना दिला.


भाजपा उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत असं सांगत, कुणी नाराज असेल तर याची चिंता नसावी. पक्षाचे आदेश सर्वजण मानतील, असं एकनाथ शिंदेनी म्हटलं.