राज्यात शरद पवार आणि राहुल गांधी यांची एकही सभा एकत्र नाही!
एबीपी माझा वेब टीम | 26 Apr 2019 08:52 AM (IST)
दुसरीकडे चौथ्या टप्प्यात मुंबईमध्ये देखील राहुल गांधी यांची सभा किंवा रोड शो देखील झालेला नाही. शरद पवार यांच्या आज कल्याण आणि ठाण्यात प्रचारसभा होणार आहेत, तर राहुल गांधी यांची शिर्डी मतदारसंघातील संगमनेरमध्ये सभा होणार आहे.
NEXT PREV
मुंबई : राज्यात आघाडी होऊन देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची एकही एकत्र सभा न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दिल्लीत राहुल गांधी आणि शरद पवार एकमेकांना भेटतात, चर्चा होतात मात्र राज्यात या दोन मुख्य नेत्यांची एकही सभा न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे दोन्ही मुख्य नेते महाआघाडीबाबत चर्चेसाठी एकमेकांना भेटतात. अगदी दिल्लीतील आप आणि काँग्रेस आघाडीबाबत शरद पवारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न देखील केला. असं असताना महाराष्ट्रात मात्र शरद पवार आणि राहुल गांधी यांची एकत्र एकही सभा झाली नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आघाडी होऊनही राज्यातील निवडणुका संपत आल्या असताना आघाडीच्या दोन प्रमुखांची महाराष्ट्रातच एकत्र सभा झालेली नाही. दुसरीकडे चौथ्या टप्प्यात मुंबईमध्ये राहुल गांधी यांची एकही सभा किंवा रोड शो देखील झालेला नाही. शरद पवार यांच्या आज कल्याण आणि ठाण्यात प्रचारसभा होणार आहेत, तर राहुल गांधी यांची शिर्डी मतदारसंघातील संगमनेरमध्ये सभा होणार आहे. सिन्नरमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार होती तिथे शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता होती. पण शिर्डी मतदारसंघात काँग्रेसने सभा घेतल्याने आणि विखे पाटील वाद असल्याने शरद पवारांनी तेथे जाण्याचे टाळले होते. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे.