आयपीएल 2019 : राजस्थानकडून कोलकात्याचा 3 विकेट्सनी पराभव
एबीपी माझा वेब टीम | 26 Apr 2019 12:03 AM (IST)
आयपीएलमध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा तीन विकेट्सनी पराभव केला आहे.
कोलकाता : आयपीएलमध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा तीन विकेट्सनी पराभव केला आहे. कोलकात्याने दिलेले 176 धावांचे आव्हान राजस्थानने तीन गडी आणि चार चेंडू राखून पार केले. आजच्या सामन्यातील विजयामुळे राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलमधील आव्हान अद्याप जिवंत राखले आहे. कोलकात्याने दिलेले 176 धावांचे आव्हान पार करताना राजस्थानची चांगलीच दमछाक झाली. अजिंक्य रहाणे (21 चेंडूत 34), रियान पराग (31 चेंडूत 47) आणि जोफ्रा आर्चर (12 चेंडूत 27) या तिघांच्या संयमी खेळींच्या जोरावर कोलकात्याचे आव्हान राजस्थानने पार करता आले. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून राजस्थानने कोलकात्याच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कोलकात्याला प्रथम फलंदाजी करताना कर्णधार दिनेश कार्तिकच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर आव्हानात्मक 175 धावसंख्या उभारता आली. कार्तिकने आज जोरदार फटकेबाजी केली. अवघ्या 50 चेंडूत 9 षटकार आणि 7 चौकारांच्या सहाय्याने कार्तिकने 97 धावा केल्या. कार्तिकला शतकाने मात्र हुलकावणी दिली. कार्तिकवगळता कोलकात्याच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. राजस्थानच्या संघात पुनरागमन करणाऱ्या वरुण अॅरॉनने चार षटकात 20 धावा देत कोलकात्याचे दोन फलंदाज बाद केले.