भिवंडी : भिवंडीतील टोरेंट कंपनीकडून कोणावरही अन्याय सहन केला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. खासदार कपिल पाटील यांच्या मागणीवरुन टोरेंटबाबत विशेष बैठक बोलावून नागरिकांना दिलासा देणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.


भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी कामतघर येथे आयोजित केलेल्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यंत्रमाग व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, निवडणूक आटोपल्यानंतर यंत्रमागाच्या वीजपुरवठ्यासाठी 27 एचपीपर्यंत मिळणारे अनुदान 40 एचपीपर्यंत वाढविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिकांसाठी सरकार संवेदनशील आहे. काही यंत्रमाग व्यावसायिकांनी माझी भेट घेतली. त्यात यंत्रमागावरील वीज अनुदानाची मागणी करण्यात आली. सध्या आचारसंहिता असल्यामुळे मी घोषणा करणार नाही, असे ते म्हणाले.

शहरातील नागरिकांना टोरेंटकडून त्रास होत आहे. पण ज्यांनी टोरेंट आणले, तेच आता शिव्या देत आहेत, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. टोरेंटकडून कोणत्याही नागरिकावर होणारा अन्याय, गुन्हे आणि छळ सहन केला जाणार नाही.  तोडगा काढण्यासाठी निवडणूक आटोपल्यावर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

भिवंडी मतदारसंघात पाच वर्षांत तब्बल 28 हजार कोटी रुपयांचा निधी आला. शहरात कॉंक्रीट रस्ते, उड्डाणपूल, पिण्याच्या पाण्यासाठी योजना, राष्ट्रीय महामार्ग अशा योजना सुरू आहेत. पण गेल्यावेळच्या खासदारांनी एक तरी काम दाखवावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

देशात दुराचार आणि भ्रष्टाचाराची मालिका कॉंग्रेसने सुरू केली. गेल्या पाच वर्षांत आम आदमींमध्ये परिवर्तन करण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले, असे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली. कॉंग्रेसकडून गरीबी हटावची घोषणा करण्यात आली. मात्र, केवळ चेले-चपाट्यांचीच गरीबी कॉंग्रेसने हटविली. कॉंग्रेसला 60 वर्ष जनतेच्या विकासासाठी संधी होती. त्यावेळी 72 पैसेही वाटले नाहीत. तर आता 72 हजार रुपये काय देणार, असा सवाल फडणवीस यांनी केला. कॉंग्रेसचे घोषणापत्र म्हणजे `कोंबडी विकण्याचा धंदा' अशी टीका फडणवीस यांनी केली.