मुंबई : राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर चौथ्या टप्प्यात मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्यात महिला कर्मचारी संचालित 'सखी मतदान केंद्र' उभारण्यात येणार आहे. या मतदान केंद्राचे मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, सहाय्यक आदी सर्व कर्मचारी महिलाच असणार आहेत.
या मतदान केंद्रात मतदानासाठी येणाऱ्या महिला मतदारांना 'सॅनटरी पॅड'चे पाकीट देण्यात येणार आहे. तसेच सखी मतदान केंद्र रांगोळी, पोस्टर्स इत्यादींनी सजविण्यात येणार आहे. सखी मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी येणाऱ्या सर्व मतदारांना थंड पेयाचा आस्वाद घेण्याचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
VIDEO | जालन्यात सखी मतदान केंद्रात मतदारांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत | जालना | एबीपी माझा
मुंबई उपनगर जिल्ह्यात येत्या सोमवारी म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदार संघांच्या कार्यक्षेत्रात एकूण 7 हजार 472 मतदान केंद्र असणार आहेत.
या प्रत्येक मतदान केंद्रावर व्यवस्थापन व नियोजनासाठी 5 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. तर यापैकी सखी मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या 26 मतदान केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या पाचही कर्मचारी महिलाच असणार आहेत. यानुसार या 26 मतदान केंद्रांवर 130 महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
VIDEO | मतदान केंद्रात 'महिलाराज', भातखेड्यात निवडणूक अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम | लातूर | एबीपी माझा