मुंबई : जे कोणत्याच भारतीय सिनेमाला जमलं नाही ते 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम'ने करुन दाखवलं आहे. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला असा छप्परतोड प्रतिसाद मिळतोय की या सिनेमाचे शोज 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.


आतापर्यंत उशिरात उशिरा म्हणजे रात्री 11.30 ला शो व्हायचा आणि परवानगी तेवढ्यापुरतीच मर्यादित होती. पण 'एण्डगेम'ला काही लिमिटच नाही. रात्री 12, 1, 2, 3 अहो पहाटे चारच्या शोला सुद्धा बुकिंग सुरु झालं आहे.

हा पराक्रम भारतीय सिनेमाला करता आला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जगात सर्वात जास्त सिनेमाची निर्मिती करणारा आपला देश. तरीही इथे छप्परतोड धंदा करतो तोसातासमुद्रापल्याड बनलेला सिनेमा. अर्थात तो सिनेमा त्या ताकदीचाही असतो. प्रश्न एवढाच की ती ताकद आपल्या सिनेमात कधी दिसणार?

दहा लाख तिकीटांचं अॅडव्हान्स बुकिंग

तिकीट विक्रीच्या बाबतीत 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम' नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बुकमायशोच्या माहितीनुसार, एकाच दिवशी 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम'च्या 10 लाखांपेक्षा जास्त तिकीटांची विक्री झाली आहे. प्रति सेंकद 18 तिकीटं या वेगात विक्री झाली आहे.

हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 'अॅव्हेंजर्सः एण्डगेम'मध्ये रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, क्रिस इवान्स, मार्क रुफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट योहान्सन आणि ब्री लारसन यांची प्रमुख भूमिका आहे. 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम' हा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा 22वा चित्रपट आहे. याआधी 'कॅप्टन मार्वल' प्रदर्शित झाला होता.

सर्वात महागड्या तिकीटाची विक्री

अॅव्हेंजर्सचे चाहतेही या सिनेमाच्या तिकीटावर पैसे खर्च करत आहेत. आतापर्यंत या सिनेमाच्या सर्वात महागड्या तिकीटाची विक्री झाली आहे. तब्बल 2400 रुपयांना तिकीट विकलं गेलं आहे. दिल्लीतील एका थिएटरमध्ये या सिनेमाचं तिकीट सर्वात महागडं होतं.

मुंबईत सर्वात महागडं तिकीट आयनॉक्सने विकलं होतं. या तिकीटाची किंमत होती 1765 रुपये. आतापर्यंत आमीर खानच्या  'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या तिकीटासाठी एवढात दर निश्चित करण्यात आला होता. पण ते देखील 1500 रुपयांना विकलं गेलं.