पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीचा उमेदवार कोण असेल? या चर्चांना सध्या उधाण आलं असून शिवसेना आणि बविआ याबाबत लवकर निर्णय घेण्यासंदर्भात चालढकल करत आहेत.


गेल्या तीन दिवसांपासून विद्यमान भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे बविआच्या तिकीटावर रिंगणात असतील अशी चर्चा रंगली होत्या. तर सोमवारी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीनिवास वनगा याना डावलून गावित यांना सेनेच्या तिकीटावर उभे करण्याचे मनसुबे रचले जात असल्याचं वृत्त सर्वत्र पसरले आणि पुन्हा चर्चेला ऊत आलं आहे. परवा महाआघाडी झाल्यानंतर त्यांचा उमेदवार जाहीर होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. परंतु बविआतर्फे अजूनही कोणतीही हालचाल झालेली नाही. बविआतर्फे माजी खासदार बलिराम जाधव, माजी आमदार मनीषा निमकर, राजेश पाटील ही नाव चर्चेत आहेत.

येत्या 2 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. परंतु उमेदवार नक्की करण्यासंदर्भात शिवसेना आणि बविआ दिवसामागून दिवस पुढे ढकलत आहेत. त्यांच्या या रणनीतीमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आहेत. खासदार गावित यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिल्यानंतरही त्यांच्याबाबत पसरत असलेल्या अफवांमुळे काय चाललंय ? अशा विवंचनेत कार्यकर्ते सापडले आहेत.

मतदारसंघाचे प्रचंड क्षेत्र, 18 लाखाच्या आसपास असलेली मतदारसंख्या, हजारो गावं आणि लाखो पाडे, यामध्ये प्रचारयंत्रणा राबवणं, हे एक आव्हान असून ते पेलणारे स्थानिक पदाधिकारी आणि गावपाड्यातील कार्यकर्त्यांची अक्षरश: दमछाक होणार आहे. त्यामुळे उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा, अशी अपेक्षा ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. परंतु त्यांच्या या अपेक्षेची वरिष्ठ, दखल घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कामास सुरुवात करण्यासाठी अद्याप एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्यामुळे हे दोन्ही पक्ष आपले उमेदवार जाहीर करण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लावतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशा या घडामोडीमुळे इच्छुक उमेदवारांचे मनोधैर्यही खच्ची होत आहे.

दरम्यान शिवसेना की भाजप या चर्चेला सध्या पूर्णविराम मिळाला असून त्याच्या जागी श्रीनिवास वनगा की राजेंद्र गावित, या चर्चेने जोर धरला आहे. दुसरीकडे बविआचा कोण? हेही अद्याप गुलदस्त्यात असल्यामुळे दोन्ही कडून तोडीस तोड उमेदवार देण्याची प्रक्रिया सुरु आहे.