मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत राज्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. राज्यात सर्वाधिक लक्ष असलेल्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पराभवाच्या छायेत दिसत आहेत.


श्रीरंग बारणे विजयाच्या उंबरठ्यावर


मावळ मतदारसंघातून यंदा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. नातू पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ही लढाई यंदा प्रतिष्ठेची केली होती. परंतु इथे शिवसेनेने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. पार्थ पवार तब्बल दीड लाख मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे श्रीरंग बारणे यांचा विजय जवळपास निश्चित समजला जातो.


पवार कुटुंबातील पहिला पराभव?


शरद पवार यांची राजकीय कारकीर्द तब्बल 50 वर्षांची आहे. आतापर्यंत लढलेल्या 14 ते 15 निवडणुकीत माझा एकदाही पराभव झालेला नाही, असं स्वत: शरद पवार सांगतात. इतकंच काय पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि पुतणे अजित पवार यांनीही पराभव पाहिला नाही. परंतु पार्थ पवार यांच्या रुपाने पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागण्याची शक्यता आहे.


वंचित बहुजन फॅक्टर


मावळ मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांना जवळपास 50 हजारांहून जास्त मतं मिळाली आहेत. पिंपरी विधानसभा हा आरक्षित आहे. तसंच उर्वरित विधानसभा मतदारसंघातही वंचित मतदार मोठ्या संख्येने आहेत. यापैकी पाटील यांना 50 हजार मतं मिळाली आहेत.


2014 ची स्थिती


2014 साली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तब्बल 5 लाख 12 हजार 226 मतांनी विजयी झाले होते. शेकाप आणि मनसेच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.


मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघ शिवसेना-भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामध्ये भाजपाचे तीन आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. केवळ कर्जत विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे.