मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला आहे. मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी हे सातत्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निशाण्यावर आहेत.


व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी म्हणतात की, "दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा योग्य व्यक्ती आहेत. मिलिंद यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीची सखोल माहिती आहे."

मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "छोट्या दुकानदारांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत, प्रत्येकासाठी दक्षिण मुंबईचा अर्थ म्हणजे व्यापार आहे. आम्हाला मुंबईत पुन्हा एकदा व्यापार आणण्याची गरज आहे आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण करणं ही प्राथमिकता बनवायची आहे."


देशाच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती एखाद्या उमेदवाराचं खुलेपणाने समर्थन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मिलिंद देवरा हे मुकेश अंबानी यांच्या जिओ या टेलिकॉम नेटवर्कच्या कॅम्पेनशी संबंधित होते.

"इतरांच्या तुलनेत मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी दिलेल्या पाठिंब्यावर सगळ्यांचं लक्ष जाईल हे मला माहित आहे. पण मला अभिमान आहे की पानवाल्यापासून छोट्या दुकानदारांपर्यंत, सर्वांचं समर्थन मिळत आहे. तुम्ही त्यांना विचारायला हवं की दक्षिण मुंबईसाठी मीच त्यांना सर्वात योग्य उमेदवार का वाटलो?," असं मिलिंद देवरा म्हणाले.

एकीकडे राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने अनिल अंबानी यांच्यावर निशाणा साधत आहेत. तर दुसरीकडे मुकेश अंबानी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करुन सर्वांना चकित करत आहेत. अनिल अंबानी यांना फायदा पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत केल्याचा आरोप राहुल गांधी सतत करत आहेत.

मुकेश अंबानी यांनी मागील महिन्यातच एरिक्सन कंपनीचं 458.77 कोटी रुपयाचं कर्ज फेडून धाकटा भाऊ अनिल अंबानींना जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं होतं. त्यावेळी अनिल अंबानी यांनी मोठा भाऊ आणि वहिनीचे जाहीर आभारही मानले होते.

वडिलांच्या निधनानंतर दोन्ही भावांमध्ये वाद
धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर 2002 मध्ये दोन्ही भावांमध्ये सुमारे दशकभर वाद सुरु होता. वडिलांच्या मृत्यूनंतर अनिल अंबानी यांच्या वाट्याला ऊर्जा आणि टेलिकॉम सेक्टर आलं होतं. तर मुकेश अंबानी यांच्याकडे तेल आणि पेट्रोकेमिकलचा बिझनेस सोपवण्यात आला. काळानुसार दोघांच्या संपत्तीमधील फरक वाढला. अनिल अंबानी कर्जाच्या ओझ्याखाली बुडाले आणि मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारुपास आले. मात्र मागील काही काळापासून दोन्ही भावांमधील दुरावा कमी झाल्याचं दिसत आहे. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाच्या लग्नातही अनिल अंबानी पत्नी टीना अंबानीसोबत सहभागी झाले होते.

कोण आहेत मिलिंद देवरा?
मुकेश अंबानी यांचा पाठिंबा मिळालेले काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांची काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते विद्यमान शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. अरविंद सावंत यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता.

मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे दोन वेळा खासदार होते. हा मतदारसंघ मुंबईतील सर्वाच उच्चभ्रू परिसर आहे. इथे उद्योजक आणि व्यापारी मोठ्या प्रमाणावर राहतात. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे केंद्रीय मंत्री आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते.