यवतमाळ : "पुलवामाची घटनेवर काही बोलले की निवडणूक आयोग बंदी लावतं. ही यंत्रणा भाजपाच्या हातातील बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या, यांना देखील जेलची हवा खायला पाठवू," असं खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्रस येथील लक्ष्मणराव बनगीनवार मैदानावर आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं.

VIDEO | सत्ता आल्यास निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू : प्रकाश आंबेडकर | एबीपी माझा



प्रकाश आंबेडकरांनी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर सडकून टीका केली. या दोन्ही पक्षांना सत्तेपासून दूर ठेऊन डाव्यांच्या आणि वंचित आघाडीच्या हाती सत्ता द्या, असं आवाहन त्यांनी केलं. शिवाय सत्तेत आल्यास केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणाची  जबाबदारी शासनाची असेल आाणि आरएसएस जेलमध्ये असेल, असंही ते म्हणाले.

कॉंग्रेसचं नेतृत्त्व मोदींच्या राजकारणाचे बळी ठरत असून पक्षातील गांधी विचारधारा असलेल्यांची गळचेपी होत आहे. तर पुलवामाची घटना ही 'मॅच फिक्सिंग' असून यावर काही बोलले की निवडणूक आयोग बंदी घालतं. ही यंत्रणा भाजपाच्या हातचे बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या यांनाही जेलची हवा खायला पाठवू, असा इशाराही आंबेडकरांनी दिला.