सांगली : सांगलीत भारतीय जनता पक्षाने दोन तालुका अध्यक्ष आणि एका भाजप युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षला नोटीस पाठवली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा खुलासा करा, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. सांगलीत भाजपचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार नियोजनाच्या बैठकीस देखील या तीन तालुकाध्यक्ष गैरहजर होते.
त्यामुळे पक्षविरोधी कारवाई करत असल्याचा ठपका ठेवत भाजपचे ग्रामीण सरचिटणीस सुरेंद्र चौगुले यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा तातडीने खुलासा करा, अशी नोटीस बजावली आहे. जर खुलासा केला नाही तर पक्षविरोधी वर्तन केल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांना दिला आहे. आटपाडीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी, खानापूर भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संग्राम माने आणि खानापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील यांना या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
भाजपचे हे तीनही तालुकाध्यश सध्या वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. कालच्या पडळकर यांच्या सांगलीतील सभेला देखील या तिघांनी हजेरी लावली होती. गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करत असल्याचा राग धरुन भाजपने ही नोटीस पाठवल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
गोपीचंद पडळकर हे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. संजयकाका पाटील यांना पाडण्यासाठीच आपण लोकसभा लढवत असल्याचे पडळकर यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. त्यामुळे हे तीन तालुकाध्यक्ष या नोटीसला उत्तर देणार की भाजपच्या पदाचा राजीनामा देणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.