मुंबई : मुंबईतील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळते की नाही अशी शंका कालपर्यंत होती. मात्र राज ठाकरेंच्या सभेला अखेर आज परवानगी मिळाली आहे. त्यामुळे नांदेड, सोलापूर, इचकरंजी, सातारा, पुणे, महाडनंतर राज ठाकरेंची मुंबईत सभा पार पडणार आहे.
येत्या 23 एप्रिल रोजी राज ठाकरेंची काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात सभा होणार आहे. मनसेने 24 एप्रिलला सभेची परवानगी मागितली होती, मात्र मनसेला एक दिवस आधी 23 एप्रिलची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील काही भाग पिंजून काढल्यानंतर राज ठाकरेंची तोफ आता मुंबईत धडाडणार आहे. या तोफेच्या तोंडी नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह असणार यात शंका नाही.
VIDEO | शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या सभेसाठी आडकाठी करण्याचे प्रयत्न? | मुंबई
याआधी, निवडणुकीच्या काळात सभेच्या परवानगीसाठी असलेली 'एक खिडकी यंत्रणा' आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून परवानगीसाठी टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. '18 तारखेला राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीसाठी प्रयत्न केला असता मनसेचा कोणताही उमेदवार निवडणुकीला उभा नसल्याने महानगरपालिकेकडून परवानगी घ्यावी असं निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्ही परवानगी देऊ शकत नाही असं सांगून परत पाठवलं', अशी माहिती मनसे नेते संजय नाईक यांनी दिली होती.
मुंबईतील शिवडी परिसरात राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळताच शिवसेनेकडून 18 तारखेला अर्ज करुन शिवडी परिसरातील चार मैदानं आरक्षित करण्यात आली, असा आरोपही मनसेने केला होता. राज्यातील शेवटच्या टप्प्याचं मतदान 29 एप्रिल रोजी होत आहे. त्यापूर्वी आणखी तीन ते चार सभा राज ठाकरे घेण्याची शक्यता आहे.
UNCUT | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण
VIDEO | विधानसभेत आघाडीला मनसेचं इंजिन लागणार का?, छगन भुजबळांकडून स्पष्ट संकेत