कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 207 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 35 परदेशी पर्यटकांचा देखील मृत्यू झाला आहे. कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये अनेक निरापराध नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे.


VIDEO | श्रीलंकेतल्या स्फोटांमागे नॅशनल तौहीद जमात? | एबीपी माझा



या स्फोटानंतर देशात खळबळ उडाली असून श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. आपत्तीच्या स्थितीचा सामना करण्यासाठी जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत.

स्फोटानंतर राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी शोक व्यक्त केला असून जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पहिला स्फोट कोलंबो येथील सेंट अँटनी चर्च, दुसरा स्फोट कोलंबो शहराच्या बाहेर नेगोम्बो परिसरातील सेबेस्टियन चर्चमध्ये , तिसरा स्फोट पूर्वेकडील बाट्टिकालोआ चर्चमध्ये झाला. ज्या हॉटेलांमध्ये स्फोट झाले त्यात शांगरीला, द सिनामॉन ग्रँड आणि द किग्सबरी यांचा समावेश आहे.

या घटनेत सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती विदेश मंत्रालयाकडून मिळाली आहे. दरम्यान विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी श्रीलंकेतील भारतीयांसाठी +94777903082 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. कोलंबोतील परिस्थितीवर आमचे लक्ष असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

राजधानी कोलंबोत ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना झालेल्या या बॉम्बस्फोटांनी श्रीलंका देश हादरला आहे.

VIDEO | सहा साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत पुन्हा दोन बॉम्बस्फोट | एबीपी माझा



येथील 3 चर्च आणि 3 फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये एकूण 6 बॉम्बस्फोट झाले आहेत. ज्यामध्ये 185 हून अधिक नागरिक ठार झाले असून,  तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  या ठिकाणी आता सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.  दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.

कोलंबोतील कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. कोलंबोच्या चर्चमध्ये या बॉम्बचा धमाका एवढा मोठा होता की त्यामुळे चर्चचे छत उडून गेले आहे.

ईस्टर संडे सणानिमित्त चर्चमध्ये यावेळी प्रार्थना सुरु होती. सर्वात पहिला धमाका हॉटेल शांग्रीलामध्ये झाला. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.