मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. अवघ्या देशाचं भवितव्य 23 मे या दिवसावर अवलंबून असल्यामुळे सर्वांचंच लक्ष निकालाकडे लागून राहिलं आहे. सत्ताधारी भाजपच्या सत्तेतील वाटेकरी असलेल्या शिवसेनेचं भवितव्यही याच दिवसावर अवलंबून आहे. महाराष्ट्रात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेच्या 23 उमेदवारांसह पक्षाचं भविष्य 23 मेच्या निकालावर अवलंबून आहे.


'सामना'तील जाहिरातीत 'ठाकरें'सोबत मुख्यमंत्र्यांना स्थान, शिवसैनिकांच्या भुवया उंचवल्या


लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. त्यात शिवसेनेचं मंत्रिमंडळातलं स्थान, उपमुख्यमंत्रिपद आणि येणारी विधानसभा निवडणूक यासारख्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे शिवसेनेची लोकसभेतली कामगिरी त्यांची पुढची दिशा ठरवणार आहे.

VIDEO | ज्यांनी मोठं केलं त्यांच्यावर टीका करणं चुकीचं : मनोहर जोशी | मुंबई 



महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने मिळून एकूण 48 जागा लढवल्या. त्यापैकी भाजपने 25, तर शिवसेनेने 23 जागा लढवल्या. लोकसभा निवडणुकीत भाजपला 272 चा जादुई आकडा गाठण्यासाठी मित्रपक्षांची गरज भासली आणि शिवसेनेच्या खासदारांचे संख्याबळ चांगले असले, तर शिवसेनेची राज्यात आणि केंद्रात बार्गेनिंग पॉवर वाढेल. मात्र संख्याबळ कमी राहिलं तर राज्यात आणि केंद्रात शिवसेनाला पुन्हा तितकासा मान-सन्मान आणि पदं मिळणार नाहीत. इतकंच काय, तर शिवसेनेची उपमुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षी मागणी मान्य होणंही कठीण जाईल.

शिवसेना आणि भाजपमध्ये जरी आता सगळं आलबेल असलं, तरी बाहेरुन दिसतं तितकं चित्र अजूनही स्पष्ट होत नाही. चंद्रकांत खैरे आणि रावसाहेब दानवे यांच्यावरुन झालेले वाद पाहता 23 तारखेच्या निकालानंतर कोणी किती लोकांचा घात केला, हे स्पष्ट होईल. जर शिवसेनेच्या वाघांनी दिल्लीत झेप घेतली, तर दिल्लीसह राज्यातल्या वाघांना ऐटीत फिरता येईल. पण जर निकालानंतर भाजपला शिवसेनेची गरजच लागली नाही तर पुन्हा वाघांची शेळी झाली नाही म्हणजे झालं.