मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज थांबला आहे. या टप्प्यात राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी 29 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह उपनगरातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.


दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात दिग्गज नेत्यांकडून दिवसभर शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी पालघरमध्ये प्रचारसभा घेतली.


चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण, मावळ, शिरुर, नाशिक, शिर्डी, नंदुरबार, धुळे, दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.


चौथ्या टप्प्यातील प्रमुख लढती


उत्तर-मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात अभिनेत्री आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आव्हान उभं केलं आहे. ईशान्य मुंबईत भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्यांना डावलून मनोज कोटक यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत होणार आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजप आपली जागा राखतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


उत्तर-मध्य मुंबईत पुनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकर विरुद्ध काँग्रेसच्या संजय निरुपम यांच्यात सामना होणार आहे.


मावळमध्ये पवार कुटुंबातील तिसरी पिढी अर्थात अजित पवार यांने पुत्र पार्थ पवार रिंगणात आहे. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचं आव्हान आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आढळराव पाटलांविरोधात अभिनेते आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल कोल्हेंनी आव्हान उभं केलं आहे. तर नाशिकमध्ये पुन्हा एकदा हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ यांच्यात तडगी फाईट होण्याची शक्यता आहे.