चंदीगड : पत्नी आणि भाजप उमेदवार किरण खेर यांच्या प्रचारादरम्यान अभिनेते अनुपम खेर यांची चांगलीच फजिती झाली. चंदीगडमध्ये प्रचारादरम्यान एका दुकानदाराने भाजपचा 2014 चा जाहीरनामा दाखवत अनुपम खेर यांना मागील आश्वासनांबद्दल विचारलं. मात्र अनुपम खेर काहीही न बोलता हात जोडून तिथून निघून गेले.

किरण खेर चंदीगडमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर सध्या मोठ्या जोशामध्ये त्यांचा प्रचार करत आहेत.

चंदीगडमध्ये प्रचारासाठी काही कार्यकर्त्यांसह अनुपम खेर एका दुकानात पोहोचले. पण दुकानदाराच्या प्रतिक्रियेमुळे अनुपम खेर काहीसे गोंधळले. दुकानदाराच्या हातात भाजपचा मागील लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा होता. जाहीरनामा दाखवत त्याने विचारलं की, "मागील निवडणुकीत तुम्ही काही आश्वासनं दिली होती, यापैकी तुम्ही काय केलं आहे?"

मात्र यावेळी अनुपम खेर यांना कोणतंही उत्तर देता आलं नाही आणि ते तिथून हात जोडून निघून गेले. अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या कमेंट्स करुन हा व्हिडीओ शेअर करत आहेत.


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनुपम खेर यांनीही आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं की, "काल किरण खेर यांच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी दोन जणांना एका दुकानात ठेवलं होतं, मला भाजपच्या 2014 मधील जाहीरनाम्यावर प्रश्न विचारण्यासाठी. मागे उभा असलेला माणूस व्हिडीओ बनवत असल्याचं पाहून मी तिथून निघालो. आज त्यांनी व्हिडीओ जारी केला. दाढीवाल्याचं कृत्य पाहा."


अनुपम खेर यांची फजिती होण्याची ही पहिली घटना नाही. याआधी सोमवारी (6 मे) अनुपम खेर एका सभेला संबोधित करणार होते. पण गर्दी नसल्याने त्यांनी सभा रद्द केली आणि दुसऱ्या सभेत गेले. स्थानिक वृत्तपत्रांनी याचे फोटो शेअर केले होते.

यानंतर खेर यांनी मंगळवारी (7 मे) काही वृत्तपत्रांची कात्रणं पोस्ट करुन वृत्तपत्रांच्या दाव्यावर टीका केली. त्यांनी लिहिलं आहे की, "पहिला फोटो अगदी खरा आहे. मी सभास्थळी वेळेच्या आधी पोहोचलो होतो आणि तिथे कोणीही नव्हतं. त्यामुळे मी दुसऱ्या ठिकाणी गेलो. पण दुसऱ्या सभेचा फोटो सत्य सांगत आहे. संबंधित वृत्तपत्र उद्याच्या अंकात हा फोटो शेअर करणार का?"


किरण खेर चंदीगडमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्येही 1,91,362 मतं मिळाली होती. तर काँग्रेस उमेदवार पवन कुमार बंसल यांनी 1,27,720 मतं मिळवली होती. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आम आदमी पक्षाच्या उमेदवार अभिनेत्री गुल पनाग होती. जागेवर विजय मिळवला होता. आता दुसऱ्यांदा त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यंदाही किरण खेर आणि पवन कुमार बंसल आमनेसामने आहेत. चंडीगड लोकसभा मतदारसंघासाठी सातव्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान होणार आहे.