मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या (23 मे) जाहीर होणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली असून लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. निकाल जाहीर होण्यासाठी उद्याची रात्र होईल, असं निवडणूक आयोगाकडून समजतंय. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विविध फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल यायला उशीर होणार आहे. प्रत्येक फेरीत मतमोजणीसाठी अर्धा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर हळूहळू कल येण्यास सुरुवात होईल.


लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यास यंदा उशीर होणार आहे कारण, यावेळी ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांचीही मोजणी होणार आहे. त्यामुळे 4 ते 5 तास अधिकचा वेळ लागणार असल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.


मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये बोरिवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली, चारकोप, मालाड (पश्चिम) या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या किमान 18 (कांदिवली विधानसभा मतदारसंघ) तर कमाल 23 फेऱ्या (बोरिवली विधानसभा मतदारसंघ) होणार आहेत.


मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या किमान 18 तर कमाल 25 फेऱ्या (गोरेगाव विधानसभा मतदारसंघ) होणार आहेत.


मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघ
मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघामध्ये मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द शिवाजीनगर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या किमान 18 तर कमाल 24 फेऱ्या होणार आहेत


मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या किमान 20 तर कमाल 25 फेऱ्या होणार आहेत.


मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील केंद्रात किमान 18 फेरी (अणुशक्ती नगर विधानसभा मतदान केंद्र) ते कमाल फेरी 21 ( धारावी विधानसभा मतदान केंद्र) होणार आहेत.


दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील केंद्रमध्ये एकूण 18 फेऱ्या ( वरळी विधान सभा मतदार केंद्र) तर कमाल 22 फेऱ्या ( कुलाबा विधानसभा मतदान केंद्र) हेणार आहेत.



भिवंडी लोकसभा मतदारसंघ
भिवंडी लोकसभा मतदारसंघात 35 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.


पालघर लोकसभा मतदारसंघ
पालघर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ निहाय होणाऱ्या मतमोजणीसाठी नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक 35 आणि पालघर मतदारसंघात सर्वात कमी 23 फेऱ्या होतील. याशिवाय डहाणू मतदारसंघात 24 तर विक्रमगड, बोईसर आणि वसई मतदारसंघात प्रत्येकी 25 फेऱ्या होतील.


रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.


हिंगोली लोकसभा मतदारसंघ
किनवट, हदगांव, उमरखेड हिंगोली, कळमनुरी, वसमत या 6 विधानसभा मतदार संघातील 74 टेबलवर 14 फेरीमध्ये मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी दरम्यान 471 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली आहे.


सांगली लोकसभा मतदारसंघ
सांगली लोकसभा मतदारसंघात 15 ते 18 फेऱ्यामध्ये मतमोजणी प्रकिया पार पडणार आहे.


नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्येक मतदार संघासाठी 14 टेबल ठेवण्यात आलेत.


जळगाव लोकसभा मतदारसंघ
जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव दोन्ही मतदार संघाची मतमोजणी एमआयडीसी परिसरात वखार महामंडळाच्या गोडाऊन परिसरात उद्या सकाळी 8 वाजेपासून सुरु होणार आहे. जळगाव मतदार संघासाठी 24 तर रावेर मतदारसंघात 23 फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.


नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शहरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 96 टेबल लावण्यात येणार असून एकूण 27 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. 23 मे रोजी सकाळी 9 वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यत याठिकाणी निकाल लागण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


जालना लोकसभा मतदारसंघ
जालना लोकसभा मतदारसंघातत 26 फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे.


वर्धा लोकसभा मतदारसंघ
वर्धा लोकसभा मतदारसंघात 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. वर्ध्यात धामणगाव, मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे.


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघआत मतमोजणीसाठी विधानसभा निहाय 24 (सर्वात कमी वणी) ते 30 (सर्वात जास्त चंद्रपूर) फेऱ्या होतील. एका फेरीला सरासरी अर्धा लागणार असून पूर्ण मतमोजणीला 13 ते 14 तास लागण्याची शक्यता आहे.


बुलडाणा लोकसभा मतदारसंघ
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.


गडचिरोली लोकसभा मतदारसंघ
गडचिरोली लोकसभा मतदारसंघ 25 फेऱ्यामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय 84 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी  800 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


अकोला लोकसभा मतदारसंघ
अकोला मतदारसंघात 84 टेबलवर एकूण 28 फेऱ्यांमध्ये मतदान होणार आहे.


भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची मतमोजणी लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात होणार असून मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत. तुमसर विधानसभा-26 फेऱ्या, भंडारा विधानसभा-33 फेऱ्या, साकोली विधानसभा-29 फेऱ्या, अर्जूनी मोरगाव-23 फेऱ्या, तिरोडा-22 फेऱ्या व गोंदिया-26 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त राहणार असून यासाठी 390 पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.