नवी दिल्ली : कोलकातामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मंगळवारी झालेल्या रोड शो दरम्यान झालेल्या राड्यानंतर निवडणूक आयोगाने प्रचाराचा अवधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयेवरून काँग्रेसने  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.


काँग्रसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, आज लोकशाहीतील काळा दिवस आहे. कारण आज निवडणूक आयोगाने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचार सभा घेण्याची परवानगी दिली आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये दोन प्रचारसभा आहेत. या प्रचारसभा संपल्यानंतर म्हणजे रात्री 10 वाजेपासून पश्चिम बंगालमध्ये प्रचार बंदी लागू होणार आहे.



पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारावरील बंदी घालण्याचा निर्णय घटनाविरोधीत असल्याचंही काँग्रेसने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने आपली विश्वासार्हता गमावली आहे. निवडणुकीतील आचारसंहिता आता मोदींची निवडणूक प्रचार संहिता बनली आहे, असा आरोप काँग्रेसने केला.


लोकशाहीवर नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपकडून हल्ला केला जातोय, त्यावेळी निवडणूक आयोग घाबरलेला आणि असहाय्य दिसत आहे. कोलकातामध्ये ज्याप्रकारे अमित शाह यांनी रोड शो काढला, त्याबद्दल त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. नरेंद्र मोदींकडून वारंवार आचारसंहितेचं उल्लंघन होत आहे, काँग्रेसने वेळोवेळी पुरावे सादर करुनही त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही, असा आरोपही रणदीप सुरजेवाला यांनी केला.