सांगली : गरीबांसाठी 72 हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे. मुख्यमंत्री आज सांगलीतील सभेत बोलत होते. महाआघाडीत सामील झालेल्या खासदार राजू शेट्टी यांच्यावरही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला.
विरोधकांनी केलेली आघाडी, आघाडी नसून महाखिचडी आहे. 55 वर्ष यांनी राज्य केले, भष्टाचार, घोटाळे केले या महाखिचडीच्या नेत्यांच्या भाषणात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नावं घेत आहेत. गरिबांना 72 हजार देणार आहेत. कुठून देणार? कोणाला देणार? याची काही माहिती नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
देशाला आता तुमची गरज नाही, मोदी आहेत. 72 हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा आहे. राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे मनोरंजना सारखे आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नका. देशाला खिळखिळी करण्याचे काम काही लोक करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
आमच्या देशाच्या लष्करात ताकत आहे, पण राजकीय लोक यांना परवानगी देत नव्हते आणि बॉम्ब पडत होते. पण मोदींनी पाकिस्तानात घुसून कारवाई केली. आम्ही हल्ला केला याचे पुरावे काय आहेत, असे विरोधक आम्हाला विचारतात. जर आधी माहित असते तर यांचा नेता रॉकेट बरोबर सोडला असता. आता चर्चा करणारे सरकार नाही ठोकणारे सरकार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
राजू शेट्टींवरही निशाणा
शरद पवारांना शिव्या दिल्या आणि तक्रारी केल्या. मात्र आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, हाच का तुमचा स्वाभिमान. आता मेंढ्याच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्याला दिली असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टींवर केली. ते सांगलीमध्ये संजय पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.