कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये विजयी धडाका कायम ठेवताना राजस्थान रॉयल्सचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. कोलकात्याचा यंदाच्या मोसमातला हा चौथा विजय ठरला. या सामन्यात राजस्थाननं कोलकात्यासमोर 140 धावांचं सोपं आव्हान ठेवलं होतं.


सुनील नारायण आणि ख्रिस लीनच्या दमदार फलंदाजीमुळे कोलकात्यानं हे आव्हान 14 व्या षटकातच पार केलं. कोलकात्याच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भक्कम भागीदारी करत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला.  ख्रिस लीननं सहा चौकार आणि तीन षटकारांसह 50 धावांची खेळी केली. तर सुनील नारायणनं 25 चेंडूत 47 धावा फटकावल्या.

तत्पूर्वी, स्टिव्ह स्मिथच्या संयमी अर्धशतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने 139 धावांपर्यंत मजल मारली.  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कोलकात्याचा निर्णय अगदी योग्य ठरला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला तात्काळ माघारी धाडण्यात कोलकात्याचे गोलंदाज यशस्वी ठरले. यानंतर जोस बटलर आणि स्टिव्ह स्मिथ जोडीने खेळपट्टीवर ठाण मांडत संघाचा डाव सावरला.  स्मिथने 73 धावांची खेळी केली.   कोलकात्याकडून हॅरी गुर्नेयने 2 तर प्रसिध कृष्णाने 1 बळी घेतला.