भंडारा-गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना पंचबुद्धे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचा पत्ता कट झाला आहे.


भंडारा- गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे 28 मे रोजी पोटनिवडणुकीसाठी इथे मतदान झालं होतं. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत झाली. ज्यात राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा पराभव केला. नाना पटोले भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढले आणि जिंकले. परंतु भाजपच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत 8 डिसेंबर 2017 रोजी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

2004 साली भंडारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर 2004 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये ते शेवटचे सहा महिने शिक्षण राज्यमंत्री होते.

नाना पंचबुद्धे हे भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी गावातील रहिवासी असून याच क्षेत्रातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. जिल्हापरिषद सदस्य ते आमदार असा नाना पंचबुद्धे यांचा प्रवास आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं होतं. त्याच काळात ते गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

सध्या ते राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान भंडारा जिल्हाध्यक्ष आहेत. या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

भंडारा-गोंदिया निकाल : राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादीच लढवणार!