Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा पार करण्यात अपयशी ठरल्यानंतर केंद्रात एनडीए सरकार स्थापन होणार आहे. एनडीएने  18व्या लोकसभेत 293 जागा जिंकल्या आहेत. एनडीएकडून बुधवारी नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच सरकार स्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला. एनडीए विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी अधिक ताकदीने काम करेल, असे मोदी यांनी यावेळी सांगितले. एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांचीही शुक्रवारी बैठक होणार आहे. दुसरीकडे, नवीन सरकार कधी शपथ घेणार स्पष्ट नाही. 


मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए शुक्रवारी सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार 17 वी लोकसभा विसर्जित केली आहे. दरम्यान, नवीन सरकार कधी शपथ घेणार हे अद्याप स्पष्ट नाही. शपथविधी शनिवारी होणार असल्याच्या बातम्या येत असताना, सुरक्षा आस्थापनातील सूत्रांनी सूचित केले की 8-9 जूनसाठी अद्याप कोणताही कार्यक्रम नियोजित केलेला नाही.


दुसरीकडे, 9 जून हा दिवस आंध्र प्रदेशातील टीडीपी सरकारच्या मंत्र्यांचा अमरावतीमध्ये शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित राहू शकतात. दरम्यान, एनडीए पक्षांचे नेते, विशेषत: टीडीपी नेते एन चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडी (यू) नेते नितीश कुमार यांच्यात केंद्रात सरकार स्थापनेच्या तपशीलावर सरकार स्थापनेचा दावा करण्याआधी चर्चा केली जाणार आहे. 


मोदींनी चर्चेची जबाबदारी कोणावर सोपवली? 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना सरकार स्थापनेच्या तपशीलांना अंतिम रूप देण्यासाठी घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे. नायडू यांनी भाजप नेतृत्वाला अजून कोणताही स्पष्ट शब्द दिलेला नाही. ज्यांचे आता 16 खासदार आहेत. केंद्रातील सरकारचा भाग असेल की बाहेरून पाठिंबा देईल, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. टीडीपीच्या एका सूत्राने सांगितले की वाटाघाटीनंतर पक्ष सरकारमध्ये सामील होऊ शकतो, असे इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. 


नायडू भाजपच्या ऑफरची वाट पाहणार? 


सरकारमध्ये सामील होण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भाजप त्यांच्या पक्षाला काय ऑफर देतो हे पाहण्यासाठी नायडू वाट पाहतील असे सूत्रांनी सांगितले. नितीश कुमार यांच्या JD(U) ला नवीन सरकारमध्ये प्रमुख मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. लोकसभा अध्यक्षपद मिळविण्यासाठी टीडीपी उत्सुक आहे, परंतु भाजपने याबाबत कोणतेही वचन दिलेलं नाही. नवीन एनडीएमध्ये निमंत्रक असणे अपेक्षित असून ते वारंवार समन्वय बैठका घेतील. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या बैठकीत, एनडीएने गरीब, महिला, तरुण, शेतकरी सेवा करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित करणारा ठराव संमत केला. 


एनडीए बैठकीला कोणते पक्ष उपस्थित?


या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एलजेपी-आरचे चिराग पासवान, जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी, जीतन राम मांझी (एचएएम), पवन कल्याण (जनसेना पक्ष), अनुप्रिया पटेल (अपना दल-एस), जयंत चौधरी (आरएलडी), प्रमोद बोरो (UPPL), अतुप बोरा (AGP), इंद्रा हँग सुब्बा (SKM), सुदेश महता (AJSU), राजीव रंजन सिंग आणि संजय झा (JD-U), प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे (NCP) हे देखील बैठकीला उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या