Lok Sabha Elections Results 2024 PM Modi Elections Result : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघात (Varanasi Election Result) तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय (Ajay Rai) यांचा दीड लाख मतांनी पराभव केला आहे. गेल्या दोन निवडणुकांतील विजयाची तुलना केली तर यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या मताधिक्यात घट झाली आहे.
गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा यावेळी मोदींना कमी मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत पंतप्रधान मोदींना 6 लाख 74 हजार 664 मते मिळाली होती. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना 6 लाख 11 हजार 439 मते मिळू शकली. तर गेल्या वेळी केवळ एक लाख 52 हजार 548 मते मिळवणारे काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना यावेळी 4 लाख 59 हजार 084 मते मिळाली आहेत. पीएम मोदींनी अजय राय यांचा 1 लाख 52 हजार 355 मतांनी पराभव केला आहे.
सुरुवातीच्या कलात मोदी पिछाडीवर
मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा एका क्षणी पंतप्रधान मोदी यांना अजय राय यांनी पिछाडीवर टाकले. पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत अजय राय यांनी पंतप्रधान मोदींवर 6000 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी सुरू झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली.
मागील दोन लोकसभा निवडणुकीत एकतर्फी विजय
मागील दोन लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून एकतर्फी विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना 6 लाख 74 हजार 664 मते मिळाली होती. समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालिनी यादव यांना केवळ 1 लाख 95 हजार 159 मते मिळाली. काँग्रेसचे अजय राय यांना 1 लाख 52 हजार 548 मते मिळाली. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीमध्ये 5 लाख 81 हजार मते मिळाली होती. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा 2 लाख 9 हजार मतांनी पराभव केला. काँग्रेससह अन्य पक्षांच्या एकाही उमेदवाराला एक लाख मतेही मिळवता आली नाहीत.