मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले आहे की, 'बाप बाप होता है'! पंतप्रधान मोदी यांना आता समजेल की, असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण?, असा शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपला डिवचले. मुंबईतील लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे तिन्ही उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. विजयाची चाहुल लागल्यानंतर शिवसेना भवनात जल्लोषाला सुरुवात झाली. यावेळी सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्त्र सोडले.
यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना म्हटले की, मुंबईत शिवसेनेची ताकद होतीच, ती आता सगळ्यांना दिसली असेल. आम्हाला कायम हिणवलं, आम्हाला शिल्लक सेना म्हटले. पण शिवसेना राखेतून उठून उभी राहिली. देवेंद्र फडणवीसांनी खोके वाटले , सर्वकाही केले. पण महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्या खोक्यांना कौल दिला नाही. शिवसेना आणि महाराष्ट्राचं अतूट नातं आहे. शिवसेना आणि महाराष्ट्राचं नातं अतूट नातं आहे. आता आदित्य ठाकरे यांनीही स्वत:चं नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांना आता कोणी आयतं मिळालं, असं बोलू शकणार नाही, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.
सुषमा अंधारेंचें डोळे पाणावले
लोकसभा निवडणुकीत मुंबईतील पाच मतदारसंघांमध्ये ठाकरे गट आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये तगडी लढत होताना दिसत आहे. यापैकी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election Result 2024) ठाकरे गटाच्या अनिल देसाई (Anil Desai) यांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. मतमोजणीच्या 17 व्या फेरीअखेर अनिल देसाई यांना 3 लाख 61 हजार 582 मतं मिळाली आहेत. तर शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांना 3 लाख 12 हजार 330 मते मिळाली. त्यामुळे अनिल देसाई यांच्याकडे 49,252 मतांची आघाडी आहे. हा कल कायम राहिल्यास अनिल देसाई यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. यावेळी अनिल देसाई आणि सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुषमा अंधारे यांचे डोळे पाणावले. अनिल देसाई यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्ष आग्रही होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी स्वत:ची पत वापरुन अनिल देसाई यांच्यासाठी दक्षिण मध्य मुंबईची जागा स्वत:कडे घेतली होती. या जागेवरुन अनिल देसाई यांनी उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात शिंदे गटाने राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली होती. राहुल शेवाळे यांना पालिकेतील राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. याशिवाय, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे अनिल देसाई यांच्यासमोरील आव्हान तगडे होते. परंतु, अनिल देसाई यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरवला. दक्षिण मध्य मुंबईत मतमोजणीच्या आणखी काही फेऱ्या शिल्लक आहेत. त्यामुळे अनिल देसाई यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक राहिल्याचे बोलले जात आहे.
मुंबईत ठाकरे गटाचा डंका
मुंबईतील लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, ठाकरे गटाचे उमेदवार उभे असलेल्या तिन्ही मतदारसंघांमध्ये पक्षाला विजय मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर असल्याने शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. तर वायव्य मुंबईत शिंदे गटाचे रवींद्र वायकर पिछाडीवर असून ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे. तर ईशान्य मुंबईतही ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी भाजपचे वर्चस्व मोडीत काढत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. या मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेचा उमेदवार होते. संजय दिना पाटील यांच्याकडे सध्याच्या घडीला तब्बल 28 हजारांची आघाडी आहे.
यावेळी आमचा विजय निश्चित आहे - डॉ. नितीन राऊत
मतमोजणीतील आतापर्यंतच्या कलानुसार महाविकास आघाडीला विदर्भ, मुंबई, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सह सर्वच विभागांत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच देशात इंडिया आघाडीची तर राज्यात महाविकास आघाडीची हवा सुरु आहे. काही तासातच लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येतील. यात भाजपला जबरदस्त धक्का लागल्याचे चित्र आपण बघणार आहोत. भाजपची झालेली घसरण देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी आहे. आमचे नेते राहुलजी गांधी हे केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोनही लोकसभा जागांवरून चांगल्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. यावेळी आमचा विजय निश्चित आहे, असे वक्तव्य नितीन राऊत यांनी केले.