मुंबई: अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अवघ्या काहीच तासांत लागणार असून देशात सत्ता कुणाची याचा फैसला (Lok Sabha Election Result 2024 ) होणार आहे. एकीकडे एनडीएचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे इंडिया आघाडी मोदींचा हा वारू रोखण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू, देशात चलती कुणाची याच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष आहे.


देशात 543 जागांसाठी मतदान पार पडलं असून त्याचा निकाल आज लागणार आहे. त्यामध्ये राज्यातील 48 जागांचा समावेश आहे. यंदा भाजप पुन्हा बहुमत घेऊन सत्ता मिळवणार का या प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या निकालावरून मिळणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र वगळता भाजपला गेल्या वेळच्या जेवढ्या जागा निवडून आल्या होत्या, तितक्या जागा राखण्यात काही अडचण दिसत नाही. 


देशाच्या सत्तासंघर्षाचं गणित महाराष्ट्र ठरवणार?


उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्राची भूमिका यंदा महत्त्वाची ठरणार आहे. पक्षफुटीनंतरचा महाराष्ट्र कोणाला कौल देणार हे आता स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचा बोलबोला की मविआची सरशी होणार हे दिसून येईल. 


राज्यातील 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपला अर्ध्या जागा मिळतील की नाही अशी चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीने, खासकरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी महायुतीसमोर मोठं आव्हान उभं केल्याचं दिसून आलं. गेल्या वेळचा विचार करता काँग्रेस-राष्ट्रवादीने केवळ 7 जागा जिंकल्या होत्या. आता महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरे असल्याने त्यांच्या जागा या 20 पेक्षा जास्त होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं जर झालं तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारला सत्ता राखण्याठी मोठे प्रयत्न करावे लागतील हे नक्की.


सात टप्प्यातील मतदान कसे झाले?


लोकसभेच्या निवडणुका देशात सात टप्प्यात तर राज्यात पाच टप्प्यात पार पडल्या. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 102, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 89, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 94, चौथ्या टप्प्यात 96 जागांसाठी 13 मे रोजी मतदान झाले. 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 96 जागांसाठी, 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 49 जागांसाठी आणि सातव्या टप्प्यात 1 जून रोजी 57 लोकसभा जागांवर मतदान झाले.


17 व्या लोकसभेचा कार्यकाळ कधी संपणार?


सध्याच्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत, देशात अंदाजे 97 कोटी (96.8 कोटी) नोंदणीकृत मतदार होते आणि 10.5 लाख मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. निवडणुकीसाठी 1.5 कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते, तर 55 लाख इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) आणि चार लाख वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.


ही बातमी वाचा: