Lok Sabha Election Exit Poll 2024 : राजकीय रणनितीकार, विश्लेषक आणि जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांची एग्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर प्रतिक्रिया समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आलेल्या विविध एक्झिट पोलनुसार, देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचेच सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात आलााय. एक्झिट पोलचा अंदाज समोर आल्यानंतर प्रशांत किशोर यांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 


राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी ट्वीटरवर (एक्स) एक्झिट पोलबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, "पुढच्या वेळी जेव्हा निवडणुका आणि राजकारणाचा प्रश्न येईल तेव्हा, खोटे पत्रकार, हाय-प्रोफाइल राजकारणी आणि सोशल मीडियावरील स्वयंघोषित तज्ञांच्या फालतू चर्चा आणि विश्लेषणात आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका."




पुन्हा भाजपच सत्तेत येणार, प्रशांत किशोर यांचा अंदाज -


2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल, असा दावा प्रशांत किशोर यांनी अनेकदा केला आहे. गेल्यावेळेप्रमाणे भाजपला 303 जागा मिळतील किंवा वाढतील. जवळपास सर्वच एक्झिट पोलने भाजपला बहुमत मिळेल असे भाकीत केले आहे.


नरेंद्र मोदी हे देशात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असून भाजपला गेल्या वेळीप्रमाणे 303 च्या जवळपास जागा मिळतील असा दावा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केला होत. 


कुणाला किती जागा मिळणार ?


एबीपी-सी व्होटरच्या एग्जिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा भाजपच्या (BJP) नेतृत्वातील (NDA) एनडीएचं सरकार येईल. एक्झिट पोलनुसार, एनडीएला 353 ते 383 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रणित  इंडिया (I.N.D.I.A) आघाडीला 152-182 जागा मिळतील. तर 4-12 जागांवर अपक्ष निवडून येतील. 


Disclaimer : ABP C व्होटर एक्झिट पोल सर्वेक्षण 19 जून ते 1 जून 2024 दरम्यान घेण्यात आला. त्याची सँपल साईज ही 4 लाख 31 हजार 182 इतकी आहे आणि हे सर्वेक्षण सर्व 543 लोकसभेच्या जागांवर करण्यात आले. त्यामध्ये देशातील 4,129 विधानसभा जागांचा समावेश आहे. ABP C व्होटर सर्वेक्षणाचे त्रुटीचे मार्जिन राष्ट्रीय स्तरावर +3 आणि -3 टक्के तर प्रादेशिक स्तरावर +5 आणि -5 टक्के इतकं आहे.