Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. अवघ्या काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. हा अंदाज खरा ठरणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच भाजपने खातं खोललं आहे. भाजपने गुजरातमधील सुरत (SuratLok Sabha Election Result) या जागेवरून विजय मिळवला आहे.


काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे बिनविरोध


या निवडणुकीत सुरत (Surat) लोकसभेतून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) हे बिनविरोध निवडून आले आहेत. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला होता. प्रमुख विरोधी उमेदवाराचा उमेदवारी अर्जच बाद झाल्यामुळे दलाल यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. कुम्भानी यांचा अर्ज रद्दबातल झाल्यानंतर या जागेवर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या इतर उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे या जागेवर निवडणूक लढवणारे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांना बिनविरोध विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं होतं.






या निवडणुकीत कोण सरस ठरणार?


आता अवघ्या काही तासांत लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी देशभात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळचे आठ वाजले की देशातील प्रत्येक मतदारसंघात मतमोजणी चालू होईल. त्यानंतर हळूहळू प्रत्येक मतदासंघाा निकाल, मतदारांचा कल समोर यायला लागेल. भाजपने या निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले होते. त्याच दृष्टीने भाजपे आपली प्रचारयंत्रणा राबवली होती. तर दुसरीकडे विरोधकांनीही या निवडणुकीत पूर्ण ताकदीने प्रचार केला होता. त्यामुळे आता या निकालात कोण सरस ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


एकूण 64.2 कोटी प्रत्यक्ष मतदान


दरम्यान, या निवडणुकीसाठी एकूण 96.88 कोटी मतदारांनी नोंदणी केली होती. त्यानंतर 64.2 कोटी प्रत्यक्ष मतदान झाले. यात 31.2 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तर संपूर्ण मतदानाची प्रक्रिया एकूण 80 दिवस चालली.