मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे (Lok Sabha Election 2024) आता देशाचं लक्ष लागलं आहे. लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी 4 जून रोजी पार पडणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. दरम्यान, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदे गटाच्या यामिनी जाधव उमेदवार आहेत. तर मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात ठाकरे गटाचे शिलेदार अनिल देसाई यांच्याविरोधात शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचं आव्हान आहे.


मतदान फेऱ्या किती होणार?


मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात विधानसभा  मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. यामध्ये वरळी विधानसभा मतदारसंघ 18, शिवडी 19, भायखळा 19, मलबार हिल 20, मुंबादेवी 16, कुलाबा 20 अशा फेऱ्या होणार आहेत. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ 19, चेंबूर 21, धारावी 19, शीव-कोळीवाडा 19, वडाळा 18, माहिम 18,अशा फेऱ्या असतील.


स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार


मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील (EVM) प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी एका लोकसभा मतदारसंघासाठी  १४ टेबल व सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. सकाळी 8 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.


भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून  मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जी.एस प्रियदर्शी (IAS) आणि राम प्रकाश (SCS) तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून राजीव रंजन (IAS) आणि नवाब दीन (SCS)यांची नियुक्ती केली आहे. 


कडक पोलीस बंदोबस्त


या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावरील आवश्यक त्या सोयीसुविधा आणि उपाययोजना बाबत मुंबई शहर  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांचा सातत्याने आढावा सुरू आहे.


मतमोजणी केंद्राच्या 300 मीटर परिसरात मनाई आदेश लागू


लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने  मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने 2 जून रोजी सकाळी 6.00  ते 5 जून रोजी मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत शिवडी येथील मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून 300 मीटर अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास मनाई असेल, असे आदेश पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई यांनी निर्गमित केले आहेत.