वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ध्यातून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरील या सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह काँग्रेसवर जोरदार टीका केली. शरद पवारांनी मतदानापूर्वीत मैदानातून पळ काढल्याचा टोला मोदींनी लगावला. तसंच पवारांच्या घरी गृहयुद्ध सुरु असल्याचंही ते म्हणाले.


या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातले भाजप आणि मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केले. ते म्हणाले की, "आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे की, इस्रोने काही वेळापूर्वीत एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करतो"

पवारांनी मैदानातून पळ काढला
मोदी म्हणाले की, "एक काळ होता की आपणही पंतप्रधान बनू असा विचार शरद पवार करत होते. निवडणूक लढवण्याची घोषणाही त्यांनी केली. पण अचानक एक दिवस म्हणाले की, मी तर राज्यसभेतच खूश आहे, मी निवडणूक लढवणार नाही. त्यांनीही माहिती आहे की, वाऱ्याची दिशा कोणत्या दिशेने आहे.

राष्ट्रवादीमध्ये गृहयुद्ध
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या गृहयुद्ध सुरु आहे. शरद पवार यांची पक्षावरील पकड सैल होत आहे आणि आता परिस्थिती अशी आहे की, त्यांचे पुतणे हळूहळू पक्षावर ताबा मिळवत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीला तिकीटवाटपातही अडचणी येत आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. जेव्हा ते सत्तेत असताता तेव्हा 6-6 महिने झोपतात. सहा महिन्यात एक जण उठतो आणि जनतेचा पैसा खाऊन पुन्हा झोपायला जातो, अशी टीका मोदींनी केली.

अजित पवारांच्या वादग्रस्त विधानाची आठवण
मोदींनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, विसरु नका, जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी अजित पवार यांना धरणातील पाण्यासंदर्भात प्रश्न विचारायला गेले असता, त्यांना काय उत्तर दिलं. असं उत्तर दिलं की, जे मी बोलू शकतही नाही.

पवार कुटुंबांनी शेतकऱ्यांवर गोळी झाडण्याचा आदेश दिला
विसरु नका, जेव्हा मावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी लढत होते, तेव्हा पवार कुटुंबाने त्यांच्यावर गोळी झाडण्याचा आदेश दिला होता. शरद पवार स्वत: शेतकरी असूनही शेतकऱ्यांना विसरले, त्यांच्या अडचणी विसरले. त्यांच्या कार्यकाळात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण पवार साहेबांनी कशाचीच पर्वा केली नाही.

सिंचन योजनांच्या नावे काँग्रेस-राष्ट्रवादीने लुटलं
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सिंचन योजनांच्या नावावर इथल्या शेतकऱ्यांना लुटलं आहे. डझनभर सिंचन योजना दशकांपर्यंत प्रलंबित राहिल्या. या योजना पूर्ण करण्याचा विडा तुमच्या या प्रधानसेवकाने उचलला आहे. लोअर वर्धा सिंचन योजनेवर वेगाने काम सुरु आहे. याद्वारे वर्ध्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे शेकडो गावांना फायदा होईल. आम्ही अतिशय प्रामाणिकपणे या परिसरातील पाण्याची अडचण कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. विदर्भातील दुष्काळ, हवामानसह भ्रष्टाचारही काँग्रेसची 70 वर्षातील देण आहे. पण त्यावर मात करण्यासाठी तुमचा चौकीदार पूर्णत: कटिबद्ध आहे.

सुशीलकुमार शिंदेंनी हिंदू दहशतवाद शब्द आणला
मोदी म्हणाले की, "वोट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. या देशाच्या कोट्यवधी लोकांवर हिंदू दहशतवादाचा डाग लागवण्याचा प्रयत्न काँग्रेसनेच केला आहे. सुशीलकुमार शिंदे केंद्रात मंत्री असताना, त्यांनी याच महाराष्ट्राच्या भूमीवर हिंदू दहशतवादाची चर्चा केली होती. काही दिवसांपूर्वीच कोर्टाचा निकाल आला आणि या निकालामुळे काँग्रेसच्या कटाचं सत्य देशासमोर आलं. काँग्रेसने हिंदूंचा जो अपमान केला आहे, कोट्यवधी जनतेला जगासमोर कमी लेखण्याचं जे पाप केलं आहे, अशा काँग्रेसला माफ करता येणार नाही."

"मला सांगा जेव्हा तुम्ही हिंदू दहशतवाद शब्द ऐकला तेव्हा वेदना झाली की नाही? हजारो वर्षांच्या इतिहासात हिंदू दहशतवाद करेल अशी एकही घटना घडलेली नाही. ब्रिटीश इतिहासकारांनीही हिंदू हिंसक बनू शकतो, याचा उल्लेख केला नाही. आपल्या 5 हजार वर्षांपेक्षा जास्त जुनी संस्कृती बदनाम करण्याचं पाप काँग्रेसने केलं आहे. हिंदू दहशतवाद शब्द कोणी आणला हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. काँग्रेसने ज्यांना दहशतवादी म्हटलं ते आता जागे झाले आहेत. शांतताप्रिय हिंदू समाजाला, संपूर्ण विश्वाला कुटुंब मानणाऱ्या हिंदू समाजाला दहशतवादी म्हटलं आहे."

  • शरद पवारांच्या घरात सध्या अंतर्गत कलह सुरु आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • मतदानापूर्वीच शदर पवारांनी निवडणुकीतून माघार घेऊन मैदानातून पळ काढला, देशातील वारं कोणत्या दिशेने वाहतंय हे त्यांनीही ओळखलं आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • काँग्रेसकडून स्वच्छता दूतांचा अपमान सुरु आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांची गर्दी, ही गर्दी बघून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • सह 28 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन : पंतप्रधान नरेंद्र मोदी