Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : चंद्रपूरचे (Chandrapur) काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचा मृत्यू हा घातपात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या आई वत्सला धानोरकर यांनी केला आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई धानोरकर यांच्या आईने केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. माझ्या मुलाचे म्हणजे बाळू धानोरकर यांचे हे जाण्याचे वय नव्हते, त्याच्या मृत्यूमागे घातपात आहे, असा आरोप त्यांनी केलाय. या सोबतच निवडणूक (Maharashtra Election 2024) झाली की बाळू धानोरकर यांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे.
मात्र या घातपातामागे कोण आहे, हे त्यांनी सांगितले नाही. बाळू धानोरकर यांचे सख्खे मोठे बंधू यावेळी वंचितच्या तिकिटावर वरोरा क्षेत्रातून लढत देत आहेत. बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई मोठ्या मुलाचा प्रचार करीत आहेत. तर दुसरीकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे हे काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा लढवत आहे, त्यामुळे वत्सलाताई धानोरकर यांनी केलेल्या आरोपांना राजकीय किनार आहे का? हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार
लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते.
तीन दिवसात पिता-पुत्राचं निधन
चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं 30 मे 2023 रोजी निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान धानोरकर कुटुंबावर मोठा आघात झाला होता. 27 मे रोजी बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झालं होतं. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं. अवघ्या तीन दिवसात पिता पुत्राच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता.
इतर महत्वाच्या बातम्या